ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह झाले खाक, अभिनेत्री “आमचं वैभव…”

09 Aug 2024 11:58:00

sonali patil
 
 
 
कोल्हापूर : कोल्हापूर नगरीला कलेचा अलौकिक वारसा आणि इतिहास आहे. याच कोल्हापुरातील प्रसिद्ध ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी भीषण आग लागल्याने नाट्यगृह जळून खाक झाले. यामुळे कलाप्रेमींना अश्रू अनावर झाले असून मराठी नाट्यसृष्टीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. शॉकसर्टिकमुळे नाट्यगृहाला आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी तिथे प्रत्यक्षदर्शी असलेल्या अभिनेत्री सोनाली पाटीलच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तिने भावूक होत, “आमचं वैभव पूर्ण खाक झालं,” असे म्हटले आहे.
 
मराठी बिग बॉसमूळे लोकप्रिय झालेली सोनाली पाटील हिने “वाईट बातमी” असं कॅप्शन लिहित व्हिडिओ शेअर केला. केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेरील व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली की, “तुम्हाला सगळ्यांना माहितीये. माझी ओळख करून देण्याची गरज नाहीये आणि ही वेळ पण नाहीये. मी आता कोल्हापुरमध्ये आहे. आजच कोल्हापुरला आलेली आहे. आजचा सगळ्यात वाईट दिवस आमच्या कोल्हापुरकरांसाठी आणि पूर्ण रंगभूमीसाठी आहे. तो म्हणजे केशवराव भोसले पूर्ण जळून खाक झालं आहे. ज्या पद्धतीने सगळी लोक इकडे येत आहेत ते बघायची इच्छा होत नाहीये. आमची सगळ्यांची नाळ जिथे जोडली गेलेली आहे. ज्या रंगभूमीवरती आणि रंगमंचावरती उभा राहिलो. आमची नाटकं एवढी झाली. ती गोष्ट, आमचं सगळ्यात मोठं घर किंवा आमचं वैभव जे आहे ते पूर्ण खाक झालं आहे. हीच गोष्ट सगळ्यांना मला सांगायची होती की, मला माहिती नाहीये पुन्हा ते उभं राहिलं तर कसं उभं राहिलं.” एवढं बोलल्यानंतर सोनालीचे अश्रू अनावर झाले आणि ती रडू लागली.
 

sonali patil  
 
सोनालीच्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर म्हणाले, “खूप वाईट झालं.” तर शर्वरी जोग म्हणाली, “खूप वाईट..खूप जास्त वाईट.” तर नेटकरी १३५ वर्ष जुन्या वास्तुला अचानक आग कशी लागली याची चौकशी व्हावी अशी मागणी करत आहेत.
Powered By Sangraha 9.0