मुंबईत स्वप्नाचं घर होणार साकार! म्हाडा मुंबई मंडळातर्फे २०३० सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू

09 Aug 2024 20:31:35

Mhada Lottery Mumbai 2024 
 
मुंबई (Mhada Lottery 2024 Mumbai) : म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते आज 'गो लाईव्ह' समारंभाद्वारे प्रारंभ करण्यात आला.
 
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जयस्वाल यांनी नागरिकांना म्हाडाच्या सोडतीमध्ये संगणकीय प्रणालीतूनच अर्ज करण्याचे आवाहन केले. सोडतीच्या कालावधीत अनेक त्रयस्थांकडून घर मिळवून देतो अशा प्रलोभनांना बळी न पडता म्हाडाच्या IHLMS 2.0 (MHADA Integrated Housing Lottery Management System) या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातूनच सोडतीत सहभाग घ्यावा. सोडत प्रक्रियेत नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व सोडतीत घर लागल्यावर सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे या सर्व बाबी या पूर्णतः ऑनलाइन असणार आहेत. अर्जदारांना म्हाडा कार्यालयात देखील यावे लागणार नाही.
 
अशाप्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही प्रणाली मानवी हस्तक्षेपविरहीत आहे. तसेच ही प्रणाली वेळोवेळी स्वयंचलित अद्ययावत होत आहे. नागरिकांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता नोंदणी प्रक्रिया अमर्याद खुली राहणार आहे. नोंदणी प्रक्रियेनंतर अर्जदाराचे कायम स्वरूपी प्रोफाइल नूतन संगणकीय सोडत प्रणालीमध्ये तयार होणार आहे. अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी या प्रणालीद्वारे त्वरित होणार आहे. अर्जदारांची पात्रता सोडतीच्या आधीच निश्चित होणार असून या प्रणालीने पात्र ठरविलेले अर्जदारच सोडतीत सहभाग घेऊ शकतील, अशी माहिती जयस्वाल यांनी याप्रसंगी दिली.
 
म्हाडाच्या सोडतीसाठी अधिकृत https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर व MHADA Housing Lottery Management System हे एप डाऊनलोड करून त्यावरूनच सोडतीसाठी अर्ज करावा, असे आवाहन जयस्वाल यांनी केले.
या प्रसंगी बोरीकर म्हणाले की, सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी २७६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या १३२७ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून प्राप्त गृहसाठ्यामध्ये ३७० सदनिका (नवीन व मागील सोडतीतील सदनिका) आणि मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ सदनिकांचा समावेश आहे. या सर्व सदनिका मोक्याच्या ठिकाणी असून त्यांचे दर बाजारभावपेक्षा कमी असून सर्वसामान्यांना परवडणारे आहेत.
 
बोरीकर यांनी पुढे सांगितले की, ज्या अर्जदारांनी यापूर्वी सोडत प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला असून कागदपत्रे संगणकीय प्रणालीत अपलोड करून नोंदणी केली आहे, अशा अर्जदारांनी आपल्या त्यावेळच्या प्रोफाइलमध्ये नोंद केल्यानुसार दरम्यानच्या काळात झालेल्या बदलांच्या नोंदी अद्ययावत करावयाच्या आहेत जसे अर्जदार विवाहित असल्यास व पती/ पत्नी यांचे उत्पन्न असल्यास दोघांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार दोघांचे दि. ०१/०४/२०२३ ते दि. ३१/०४/२०२४ या कालावधीतील ‌(Assessment Year- 2024-25) आयकर विवरणपत्र अथवा कुटुंबाचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला नव्याने अपलोड करावा. अशा अर्जदारानी नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही व इतर कागदपत्रे देखील पुन्हा सादर करण्याची गरज नाही, असे बोरीकर यांनी सांगितले.
 
सोडतीत सहभाग घेण्याकरिता येणार्‍या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मंडळातर्फे ०२२-६९४६८१०० हा हेल्पलाइन क्रमांक अहोरात्र कार्यरत आहे. त्याचबरोबर अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन बोरीकर यांनी केले आहे.
 
यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद शंभरकर, मुख्य अभियंता-२ धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार पी. डी. साळुंखे, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल अंकलगी, विधी सल्लागार मृदुला परब, उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी श्रीमती सविता बोडके, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली गडपाले आदी उपस्थित होते.
 
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती दिनांक ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक १० सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक ११ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता काढण्यात येणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल.
 
 
Powered By Sangraha 9.0