पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ७५ फुटी राष्ट्रध्वज स्तंभाचे अनावरण

09 Aug 2024 17:30:27

Mangal Prabhat Lodha
 
मुंबई :जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बोरिवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्यद्वाराजवळ ७५ फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे. आज ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते येथे ध्वज फडकवण्यात आला. यावेळी संजय गांधी नॅशनल पार्कच्या विकासासाठी सरकारद्वारे २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची घोषणा मंत्री लोढा यांनी केली. तसेच या कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले.
 
या निधीच्या माध्यमातून संजय गांधी नॅशनल पार्कमधील रस्त्यांचा विकास, मुख्यद्वाराचे आणि आतमधील इमारतीचे नूतनीकरण, पर्यटनासाठी सुविधा, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या व्यतिरिक्त सामाजिक न्याय विकासाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी चित्ररथ व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. तसेच याठिकाणी आलेल्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत देखील करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते याठिकाणी इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज हा मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल. याठिकाणी रोज ७.३० वाजता नागरिकांना झेंडावंदनाचा आणि राष्ट्रगानाचा कार्यक्रम अनुभवता येणार आहे.
 
प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "हा ध्वज राष्ट्रप्रेमाची, बलिदानाची आठवण करून देणार आहे. आज आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले म्हणून आपल्याला राष्ट्रध्वज फडकविण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशात लोकशाही आली आणि आपल्याला माननीय नरेंद्र मोदीजींसारखा नेता मिळाला. आपल्या देशासाठी सर्वांनी एकत्र यावे, सरकारसह उभे रहावे अशी मी नागरिकांना विनंती करतो. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासासाठी अतिशय वेगाने कार्य सुरु आहे."
 
 
 
Powered By Sangraha 9.0