मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते म्हणजेच डॉ. श्रीराम लागू आणि अशोक सराफ. अशोक सराफ यांनी डॉ. लागू यांच्यासोबत नाटकांमध्येही कामं केली आणि त्यावेळी त्यांची एक गोष्ट अशोक सराफ यांनी आत्मसात केली होती. याबद्दल त्यांनी ‘महाएमटीबी’शी बोलताना असंख्य जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्रत्येक कलाकाराच्या मनात रंगभूमीची एक विशेष जागा मनाच्या कोपऱ्यात असते. अशोक सराफ यांच्याही बाबतीत ते विशेष आहेच. आत्तापर्यंत विविध नाटकांमध्ये त्यांनी अनेक कलाकारांसोबत कामं केली. त्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले की, “डॉ. श्रीराम लागू, निळू फुले अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन आणि रंगमचावर काम करण्याची संधी मला मिळाली. या कलाकारांसोबत काम करतान मी नजरेने अनेक गोष्टी हेरल्या आणि माझ्याकडे अभिनेता म्हणून जपून ठेवल्या. म्हणजे नाटकाचा प्रयोग सुरु असताना डॉ. लागू यांच्याकडून मी वक्तशीरपणा शिकलो. कारण, नट म्हणून वक्तशीरपणा फायद्याचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाटकाचा प्रयोग सुरु असताना प्रामाणिकपणा फार गरजेचा आहे. तो कसा? तर प्रयोगात आपलं काम झालं की ग्रीन रुममध्ये न जाता डॉ लागू विंगेत खुर्ची टाकून शांत बसायचे. मी पुर्वी आपलं काम झालं की हिंडायचो पण त्यांच्यासोबत काम करत असताना मी ती बाब शिकलो आणि आजही मी नाटकाच्या प्रयोगाला ते काटेकोरपणे पाळतो”.