मुंबई : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. १ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला असला तरी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नव्हता. मात्र, ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला आणि विषयाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग थेट सर्वोच्च न्यायालयात केले जाणार आहे.
किरण रावने दिग्दर्शित केलेला ‘लापता लेडीज’ आज ९ ऑगस्ट रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाखवला जाणार आहे. यासंदर्भात एक नोटीस देण्यात आली आहे, ज्यामध्ये या चित्रपटाच्या स्क्रीनिंगबद्दल माहिती दिली असून निर्माता आमिर खानसह स्वतः किरण राव स्क्रीनिंगला उपस्थित राहून उपस्थितांशी संवादही साधणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यावर दाखवला जाईल. दरम्यान, या स्क्रिनिंगबद्दल न्यायाधीश म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केला आहे, त्यामुळेच ही स्क्रीनिंग होत आहे. सर्वोच्च न्यायालयात अशा अनेक गोष्टी घडत आहेत, ज्यांचा प्रचार केला जात नाही. जसे की आता आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी २४ तास उपलब्ध असलेले आयुर्वेदिक क्लिनिक आहे. त्यामुळे, हे स्क्रीनिंग सदस्यांमधील परस्पर संबंध मजबूत व्हावे यासाठी आहे,” अशी माहिती सरन्यायाधीशांनी बार अँड बेंचला दिली.