दि. 8 ऑगस्ट 1942च्या संध्याकाळी महात्मा गांधींनी देशभरातून जमलेल्या सर्व देशभक्तांसमोर ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रांगणातून सरकारला ‘चले जाव’, ‘क्विट इंडिया’चा निर्वाणीचा इशारा दिला आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दि. 9 ऑगस्टपासून ‘करो या मरो’ हा कृतीसंकल्प जाहीर केला. त्यानिमित्ताने आजच्या पूर्वार्धात ऑगस्ट क्रांती मैदानाचे आत्मकथन आणि उद्याच्या उत्तरार्धात दि. 9 ऑगस्ट हा ‘जागतिक मूल निवासी दिवस’ म्हणून का साजरा करु नये, त्याचा विस्ताराने उहापोह करु.
दि. 3 ऑगस्ट. मी अगदी अस्वस्थ झालेलो आहे. बेचैन होऊन काकुळतीने आयोजकांची वाट पाहत आहे. महिनाभरापूर्वी सुरू होणार्या लगबगीची, त्या माझ्या जुन्या दिवसांची त्या ऐतिहासिक दिनाची. ज्यामध्ये, मुंबईच्या विविध शाळेतील चिमणी पाखरे सकाळपासून अगदी दुपारपर्यंत, विविध माध्यमांतून माझा पराक्रम दरवर्षी मलाच ऐकवायची. विविध देशभक्तीपर गाणी, कवायती, स्पर्धा अगदी भारावलेला तो दिवस असायचा, जो मला एकेक क्षण मागे नेत अगदी दि. 9 ऑगस्ट 1942 रोजी घेऊन जायचा. काय घडलं नेमके त्यादिवशी? ऐकायचं आहे? तर ऐका माझी कहाणी!
खरं म्हणजे मुंबईच्या ग्रॅण्ट रोड परिसरातील मी एक साधं मैदान, ज्यात एक पाण्याचे कुंड होते आणि आजूबाजूच्या गायी त्यात मनसोक्त डुंबायला यायच्या. आज जरी माझे नाव ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ असले, तरी पूर्वीचे नाव फार कोणाला आठवत असेल, असं वाटत नाही. एवढंच काय, पण माझंच मी ते रूप, नाव फार विसरून गेलो आहे. हां.. आठवले काय? तर ‘गवालिया टँक’ हे माझं मूळ नाव. त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सर्वत्र धामधूम चाललेली होती. खरं तर भारतवर्ष गेल्या एक हजार वर्षांपासून वेगवेगळ्या आक्रमणकार्यांसोबत संघर्ष करत होता.
अगदी सुरुवातीला क्रूर, आक्रमक, लुटारू गजनी खिलजीपासून ते मुघल, तुर्क, पोर्तुगीज, फ्रेंच, डच व इंग्रज यांच्या कपटी आणि पाताळयंत्री महत्त्वाकांक्षेपाई पूर्ण भारत हा विभिन्न टप्प्यात गुलामगिरीच्या वरवंट्याखाली पिसला जात होता. त्यातच अत्याधुनिक शस्त्र, कपटी व कावेबाजपणा यांमध्ये इंग्रज वरचढ ठरले व त्यांनी भारतावर 1757 सालच्या प्लासीच्या लढाईपासून आपला अंमल कायम करत नेला, तो अगदी 1947 सालापर्यंत.
इंग्रजांच्या विरोधामध्ये भारताच्या सार्या प्रदेशात, सर्व लोकांनी अगदी सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी असा संघर्ष उभा केला आणि इंग्रजांना हा देश सोडायला भाग पाडले. यात प्रामुख्याने 1857 सालचे प्रथम स्वातंत्र्यसमर, 1818 मधील उमाजी नाईकांचा संघर्ष, 1848 पंजाब क्षेत्रातील रणजित सिंहाचा पराक्रम, त्यानंतर जनजातीवीरांचे संघर्ष, महाराष्ट्रातील बेरड व रामोशींना सोबत घेऊन वासुदेव बळवंत फडके यांनी केलेला सशस्त्र संघर्ष, या सर्व पार्श्वभूमीवर 1885 मध्ये सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याची मोहीम सुरू झाली. त्यातून काँग्रेसची स्थापना होऊन ब्रिटिश सरकारसोबत वाटाघाटी करत लढण्याचे तंत्र सुरू झाले.
लोकमान्य टिळकांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ या निर्धाराने बरोबरीने स्वावलंबन, स्वदेशी आणि स्वतंत्र ही त्रिसूत्री उदयाला आली. त्यातूनच लाल, बाल, पाल यांचा उदय होऊन बंगालची फाळणी रद्द झाली. 1920 साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात महात्मा गांधींचे पर्व सुरू झाले. आणि त्यातून सरकारच्या विरोधामध्ये अहिंसात्मक, असहकार आंदोलन, कायदेभंग, उपोषण व सत्याग्रह चळवळ हे नवीन अस्त्र उदयाला आले. अनेक युवकांनी क्रांतीचा मार्ग अनुसरूनही पाहिला, परंतु गांधीजींच्या या नूतन आंदोलनासोबत सामान्य माणूस सर्वतोपरी जोडला. तो रस्त्यावर उतरला. कोणतीही किंमत मोजायला तयार झाला. जिनाने ‘मुस्लीम लीग’मार्फत देश तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याला उत्तर देण्यासाठी वीर सावरकरांनी ‘हिंदू महासभा’ बलशाली केली.
यातून ज्या ज्या काही गोष्टी स्वतंत्र भूभाग म्हणून आपल्याला हव्या होत्या, त्या मिळवण्याचा प्रयास सुरू झाला. या सर्व काळामध्ये ज्यांचे आपल्यावर राज्य होते, त्या इंग्रजांना जागतिक पहिल्या व दुसर्या महायुद्धाला सामोरे जावे लागले आणि जेव्हा इंग्रज हे पूर्णपणे दुसर्या महायुद्धामध्ये पराजयाच्या शक्यतेने वेढलेले होते, त्यावेळेस त्यांचाही आपल्या अस्तित्वासाठी निकराचा लढा सुरू झाला.
1939 मध्ये सुरू झालेले युद्ध 1942 साल उजाडेपर्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचले होते. काँग्रेसमध्येही या परिस्थितीचा फायदा घेऊन रावी नदीच्या किनार्यावर पारित केलेला संपूर्ण स्वराज्याचा ठराव अमलात आणावा यासाठी प्रयत्न सुरू झाले.
स्वातंत्र्य देण्याबाबतची ‘क्रिप्स योजना’ अयशस्वी झालेली होती. या पार्श्वभूमीवर जुलै 1942 मध्ये वर्धा येथे झालेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये मुंबईच्या पुढील अधिवेशनामध्ये ‘करो या मरो’, ‘Quit India’, ‘इंग्रजांनी या देशातून चालते व्हावे’ असा नारा महात्मा गांधींनी देण्याचे ठरवले आणि त्या ऐतिहासिक आंदोलनासाठी माझी म्हणजेच ‘गवालिया टँक’ची निवड झाली. खरोखरच जीवन कृतकृत्य झालं.
1942च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जपान भारताच्या सीमेपर्यंत पोहोचला होता. परंतु, इंग्रज हे जरी युद्धामध्ये व्यस्त असले, तरी भारतीय राजकारणावरील त्यांची पकड मजबूत होती. कारण, ब्रिटिशांचा जगावरील प्रस्थापित झालेल्या साम्राज्याचा सूर्यास्त हा भारतच करू शकतो, हे त्यांना माहिती होते.
त्यावेळेला अमेरिकेनेही भारतीय स्वातंत्र्याबाबत पाठिंबा दर्शवत इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांना विनंती केली होती. परंतु, चर्चिलच्या मनात काँग्रेस व महात्मा गांधींबद्दल प्रचंड आकस होता. त्यामुळे त्यांनी भारताला कोणत्याही पद्धतीचे स्वातंत्र्य देण्यास स्पष्ट नकार दिला.
अशा अत्यंत संवेदनशील वातावरणात दि. 8 ऑगस्ट 1942च्या संध्याकाळी महात्मा गांधींनी देशभरातून जमलेल्या सर्व देशभक्तांसमोर माझ्याच प्रांगणातून सरकारला ऐतिहासिक असा निर्वाणीचा इशारा दिला. ‘इंग्रजी शासन चले जाव’, ‘क्विट इंडिया’ आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उद्या दि. 9 ऑगस्टपासून ‘करो या मरो’ हाच आमचा कृतीसंकल्प असेल, असे जाहीर केले.
इंग्रजांनी आगामी धोका ओळखून इंग्रजी हुकुमताच्या अन्यायी कायद्यानुसार महात्मा गांधी, पंडित नेहरू बरोबरीने सर्व काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना रात्रीच अटक करून विविध तुरुंगात पाठवले.
उद्यापासून होणारा संघर्ष आजच संपतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु अधिवेशनाला हजारो लोक उपस्थित होते आणि त्यांचा निर्धार पक्का होता. ब्रिटिश सरकारने दमनशाही करत सर्व प्रमुख नेत्यांना अटक केलेली होती. त्यामुळे ते आता निर्धास्त होते की, दुसर्या दिवशी दि. 9 ऑगस्टला काहीच होणार नाही.
परंतु, मला अभिमान वाटतो की, त्या वेळेला पूर्ण आंदोलनाची कमान महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली. अरुणा असफल्ली व कस्तुरबा गांधी यांनी मोर्चाचे नेतृत्व करत काँग्रेस व गांधीजींचा निर्धार लोकांच्या समोर व्यक्त केला आणि ‘आज नाहीतर कधी नाही’, ‘अब नही तो कभी नही’, ‘क्विट इंडिया मोमेंट’चा नारा संपूर्ण माझ्या परिसरात दुमदुमत देशभरामध्ये पोहोचला.
पहिले दोन दिवस अत्यंत शांततेने निदर्शने सुरू झाली. परंतु, इंग्रजांनी त्यावर अन्यायी लाठीमार सुरू केला. अनेकांची धरपकड केली. अनेकांवर गोळ्या झाडल्या. त्यातून हे आंदोलन हिंसकतेच्या मार्गाने जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सिद्ध झाले. इंग्रजी अधिकार्यांना मारणे, जेरीस आणणे, कोणाला सहकार्य नाही. इंग्रजांची कोणतीही आज्ञा मानायची नाही. इंग्रजांचे तार खाते बंद करणे, रेल्वे रूळ उखडणे. प्रशासन बिल्डिंगवर ‘हल्ला बोल’ करून झेंडा लावत ते ताब्यात घेणे, असा प्रकार सर्वदूर सुरू झाला.
मला आजही स्पष्ट दिसत आहे. सुदूर आसाममधील 23 वर्षांची कनकलता बरुआ असेल, नंदुरबारमधील बाल शिरीष कुमार असेल, अमरावतीची प्रशासन इमारत असेल, ओडिशामधील मलकानगरीचे गांधी लक्ष्मण सिंह असतील, अरुणाचलमधली सुतक ताई असेल, सातारा परिसरातील नाना पाटील यांनी सुरू केलेले प्रतिसरकार असेल अशा वेगवेगळ्या लोकांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. आपले प्राण गमावले.
एक तर इंग्रजांनी दमणशाही करत प्रमुख नेत्यांना अटक केली. त्याचा राग होताच आणि निर्धार केला. तो पूर्ण करायचाच, या निर्धाराने जनता जुलमी प्रशासनासमोर लढली परिणामस्वरूप पुढील पाच वर्षांत बघता बघता या ठिणगीचे वणव्यात रूपांतर होऊन दि. 15 ऑगस्ट 1947 ला अर्धे का होईना, स्वातंत्र्य मिळाले, त्या वणव्याची ठिणगी ही माझ्या प्रांगणामध्ये पडली, याचा आजही सार्थ अभिमान वाटतो..
खरं तर माझे मूळ नाव ‘गवालिया टँक’ याचा संदर्भ गायीशीदेखील आहे. पूर्वी माझ्या परिसरात असलेल्या छोट्या जलकुंडामध्ये गायींना आंघोळ घालण्यासाठी आणले जायचे, त्यामुळे एका अर्थाने मी गोस्पर्शाने रोज पुनीतच होत होतो. परंतु, या ऐतिहासिक आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने माझे नाव बदली करून ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ केले, ज्यात वीरस्तंभ ही डौलाने उभा केलेला आहे.
पुढे दि. 9 ऑगस्ट हा ‘क्रांती दिन’ म्हणून साजरा करण्याचे योजले गेले. त्यानुसार अनेक वर्षे सरकारी सोहळ्यांतर्गत माझ्या गौरवाचे कार्यक्रम होऊ लागले.
परंतु, गेल्या काही वर्षांपासून सरकारी यंत्रणा मला पूर्णपणे विसरलेली आहे, असे वाटते. कारण, अनेक वर्षांत कोणताच कार्यक्रम झालेला नाही आणि आत्ताही ऑगस्टचा पहिला आठवडा झाल्यानंतर कोणतीही हालचाल दिसून येत नाही. क्रिकेट आणि सकाळी फेरी मारणार्यांवर अजून कोणतीतरी बंदी आलेली आहे. बहुतेक यंदा कार्यक्रम होणार नाही, असे दिसते, म्हणून मी अस्वस्थ आहे. सुन्या सुन्या मैदानात माझ्या जुने दिवस आठवत आहे...
टीप : कोणीतरी असे म्हटले की, आता दि. 9 ऑगस्ट हा ‘चले जाओ, क्रांती दिन’ म्हणून ओळखला जात नाही, तर तो ‘जागतिक मूल निवासी दिवस’ म्हणून भारतात आदिवासी पाड्यापाड्यांवर ‘आदिवासी गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. त्यासाठी सरकारी परिपत्रक, सरकारी अनुदानाने कार्यक्रम राबवले जातात. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, दि. 9 ऑगस्ट हा भारतीय मूल निवासी गौरवाचा दिवस कधीच होऊ शकत नाही. सरकारला इतकेच सांगणे आहे की, माझा गौरव दिवस एकवेळ साजरा करू नका, परंतु दि. 9 ऑगस्ट मूल निवासी दिवस म्हणून साजरा करूच नका.
त्या संदर्भातील कथन मी उद्या करीन, तिथपर्यंत पूर्वी साजरा होणार्या दि. 9 ऑगस्ट क्रांती दिनाबाबत आपले आपले अनुभव आपण सांगू शकता. प्रसारित करू शकता. मी ऐकायला उत्सुक आहे.
(क्रमश:)
शरद चव्हाण
(लेखक जनजाती सामाजिक कार्यकर्ता आणि इतिहास विषयक लेखक आहेत.)