मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही कौशल्य शिक्षण द्याला हवे. कारण या शिक्षणामुळे भविष्यात त्यांना विविध विभागांतील प्रगतीच्या वाटा खुल्या होतील, असा विश्वास कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालांत परिक्षेत उच्चतम गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व अधिकतम निकाल देणाऱया शाळांचा आणि मुख्याध्यापकांचा गुणगौरव सोहळा भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात दि. ७ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महापालिकेच्या २४८ शाळांपैकी ७९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून उर्वरित १३५ शाळांचा निकालही ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. या शाळांमधील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षण, मुख्याध्यापकांचा गुणगौरव या सोहळ्यात करण्यात आला. यावेळी लोढा म्हणाले की, महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि संपूर्ण यंत्रणा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी खूप प्रयत्न करतात. त्याच प्रयत्नांचे फलित म्हणजे आजचा हा गुणगौरव सोहळा आहे, असे गौरवउद्धगार ही मंत्री लोढांनी काढले.
दरम्यान शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दहावीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आयुष जाधव (९७.४०टक्के), वरुण चौरेसिया (९७.२०टक्के), शगुन पटवा (९५.२० टक्के) या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांसह, गुणवंत शिक्षण आणि मुख्याध्यापकांचाही प्रशस्तिपत्र आणि चषक देवून याप्रसंगी गौरव करण्यात आला. या सोहळ्यास आमदार यामिनी जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदींसह अधिकारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे गुणे पाहून येत्या काळात महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी नक्की रांगा लागतील. तसेच शाळांची प्रगती, शिक्षक-मुख्याध्यापकांकडून होणारा गुणगौरव सोहळा पाहून आपल्याला पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घ्यावेसे वाटते आहे.
आमदार यामिनी जाधव
दहावी ही स्पर्धेची सुरुवात असते. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. त्यामुळे या यशाने हुरळून न जाता पुढील शिक्षणासाठी आणखी जोमाने अभ्यास करा.
डॉ. अमित सैनी ,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)
मी स्वत: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे यश पाहून अभिमान वाटतो.
चंदा जाधव ,उपायुक्त (शिक्षण)