मुंबई : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने इतिहास रचला आहे. अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली असून आता भारताचं पदक निश्चित झालं आहे. विनेशचं सध्या सर्वच स्तरांतून कौतुक सुरु आहे. काही वर्षांपुर्वी आमिर खानचा 'दंगल' चित्रपट हा फोगाट बहिणींवरच आला होता. गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांची विनेश ही चुलत बहीण. विनेशच्या या दमदार कामगिरीनंतर 'दंगल'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांनी विशेष पोस्ट लिहित तिचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
फातिमा सना शेखने 'दंगल'मध्ये कुस्तीपटू गीता फोगाटची तर सान्याने बबिता फोगाटची भूमिका साकारली होती. फातिमा सना शेखने पोस्ट करत लिहिले आहे की, 'तिची खेळाडू वृत्ती तर बघा. देशात सुरु असणाऱ्या आंदोलनांमुळे तिच्यासाठी हे वर्ष सोपं नव्हचं. रस्त्यावर उतरुन तिला सर्वांनी रडताना पाहिलं. पण या सगळ्याने ती खचली नाही तर याउलट योद्ध्यासारखी लढली”. तर सान्या मल्होत्राने लिहिले, 'ती फीनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून वर आली आहे. विनेश फोगाटने वर्ल्ड नंबर १ हरवलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला,' असे तिने लिहिले आहे.