भविष्याचा वेध घेताना उत्पन्नाच्या बाबतीत आपले काही स्वत:चे असणे केव्हावी चांगले, हे मनाशी ठरवत ‘नेचर्जी’ या कृषिउत्पादनांच्या कंपनीची निर्मिती करणार्या संपदा मंदार कानडे यांच्याविषयी...
प्रत्येक माणूस यशस्वी होण्याचे स्वप्न बघत असतोच. त्यासाठी तो प्रयत्नदेखील करतो. सगळ्यांनाच यश मिळते असे नसले, तरी प्रामाणिकपणा आणि व्यवहारी स्वप्ने बघितल्यावर यश मिळाल्याची उदाहरणेदेखील कमी नाहीत. याचेच एक उदाहरण म्हणजे, संपदा मंदार कानडे होय. बदलापूरला राहणार्या संपदा यांचा जन्म डोंबिवलीचा. घरची परिस्थिती म्हणजे आदर्श मध्यमवर्गीय मराठी कुटुंब. अशा वातावरणात लहानाच्या मोठ्या झालेल्या संपदांचे प्राथमिक शिक्षण डोंबिवलीतल्या स्वामी विवेकानंद शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर संपदा यांनी पुढचे शिक्षण वाणिज्य शाखेत घेण्याचा निर्णय घेतला. वाणिज्य विषयात पदवी संपादन केल्यानंतर, संपदा यांनी ‘ऑपरेशन आणि फायनान्स’मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर काही वर्षे खासगी क्षेत्रात कामाचा अनुभव घेतला. पण, ही नोकरी करताना, डोक्यात सतत एक विचार होता की, जे शिक्षण घेतले आहे, त्याचा परीपूर्ण वापर या नोकरीत करता येणे शक्य नाही. म्हणून संपदा यांच्या मनात काही वेगळे करण्याचे वारे रुंजी घालत होते. यादरम्यानच लग्न झाल्याने, थोडा वेळ नक्कीच त्यांनी हा विचार बाजूला ठेवला.
मात्र, एक काळ असा आला की, संपदा यांना मनातील विचारांना गांभीर्याने घेणे भाग पडले. तो काळ होता, कोविड साथरोगाचा! या काळात अनेक लोकांचे काम घरूनच सुरु होते. तर याच काळात संपदा यांनी काही नवीन सुरु करण्यासाठी धडपड सुरु केली. नैसर्गिक कृषिउत्पादनाबाबतीतच काही करावे, हे संपदा यांचे निश्चित होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी सुकामेवा विकण्यास सुरुवात केली. यामध्ये लागणारा काजू हा कोकणातून, त्यांच्या भावाकडूनच त्यांनी विकत घेतला. तर इतर सुकामेवा मात्र विकत घेण्यासाठी संपदा यांना अनेक कष्ट करावे लागले. सुकामेव्यात अनेक प्रकार असतात, यात बदल झाल्यास वस्तूच्या गुणवत्तेवर फरक पडतो हे संपदा यांना ठाऊक होते. तसेच ‘माझे उत्पादन हे ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचे उत्पादन असायला हवे,’ हे संपदा यांचे स्वप्न होेते. यासाठी अनेक कष्ट उपसायला लागले, या सगळ्या कार्यात संपदा यांना सासर आणि माहेरच्यांनी पूर्ण सहकार्य केले.
कोविड काळ असला तरीही, नक्कीच संपदा यांच्या नव्या व्यवसायावर ग्राहकराजा प्रसन्न झाला होता. बदलापुरात मोठ्या प्रमाणात सुकामेवा विकला गेला. कोविड काळ सरल्यावर संपदा यांनी आपल्या व्यवसायाचे सीमोल्लंघन करत, डोंबिवलीपर्यंत आता कक्षा वाढवल्या. मात्र, त्यावेळी सुकामेवा हा बारमाही उपलब्ध होऊ शकत नसल्याची अडचण समोर आली. त्यामुळेच बारमाही करता येईल, अशा उत्पादनांची गरज संपदांना भासू लागली. आपल्या मराठीत एक म्हण आहेच, गरज हीच शोधाची जननी आहे. या उक्तीला अनुसरून शोध घेण्यासाठी, यूट्युबच्या माध्यमातून अनेकांच्या यशोगाथा संपदा यांनी बघितल्या.
एक दिवस त्यांच्या असे लक्षात आले की, भारतीय संस्कृती सणांनी समृद्ध आहे. आणि सणवाराात केल्या जाणार्या गोडधोड पदार्थांना वेलचीशिवाय मजाच नाही. त्यामुळे वेलचीबाबत अधिक माहिती घ्यायला संपदा यांनी सुरुवात केली. त्यावेळी संपदा यांना लक्षात आले की, वेलची पावडरचे उत्पादन बाजारात सहजासहजी उपलब्ध नसते. आणि उपलब्ध असले तरी, ती चवीला गोड असते. त्यामुळे शुद्ध वेलची पावडर हेच आपले पुढचे उत्पादन निश्चित करून, संपदा यांनी उत्पादन घेण्याच्यादृष्टीने अभ्यास सुरु केला. सुरुवातीला बाजारातून थोडीशी पूर्ण वेलची आणून घरातच त्याची पावडर करण्याचा प्रयोग त्यांनी निरीक्षणासाठी करून पाहिला. यामुळे त्यांना वेलची पावडर, त्याचे गुण, मर्यादा यांचा सखोल अभ्यास प्रत्यक्ष करता आल्याचे संपदा सांगतात. मग उद्योगाला आवश्यक दुसरी यंत्रसामग्री घेऊन संपदा यांनी व्यवसायाला गती देण्याचे निश्चित केले. या कामात संपदा यांचे पती मंदार कानडे यांचे पूर्ण सहकार्य त्यांना मिळाले.
मंदार हे मार्केटिंग क्षेत्रात असल्याने त्यांचा बाजारपेठेचा अनुभव संपदा यांच्या कामी आला. कच्चा माल मिळवण्यासाठी हे दाम्पत्य केरळला गेले. केरळला मसाल्यांच्या पदार्थांचा मोठा बाजार असतो. मात्र, बाजारात गेल्यावर भाषेची अडचण जाणवू लागली. परिणामी तिकडच्या एका एजंटला हाताशी धरूनच उत्कृष्ट प्रतीच्या कच्च्या मालाची व्यवस्था त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात लोकांकडून याला फार मागणी आली नाही. मात्र उत्पादनाचा दर्जा लक्षात आल्यानंतर वेलची पावडरची मागणी वाढतच गेली. संपदा कानडे यांची वेलची पावडरला आज बदलापूर, डोंबिवली, ठाणे आणि गिरगाव या ठिकाणी मिळू लागाली. सध्या संपदा यांच्याकडे वेलची पावडरबरोबर केशर सिरप आणि ओट्स आटादेखील उपलब्ध आहे. यापैकी वेलची पावडर आणि ओट्स आटा यांचे उत्पादन संपदा स्वतः करत असून, केशर सिरप मात्र त्या दुसर्या कंपनीचे विकत आहे. या सगळ्या उद्योगाला मोठे करण्याचे स्वप्न संपदा यांनी मनाशी बाळगले असून ‘नेचर्जी अॅग्रो प्रोड्क्टस’ या नावाने त्यांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांतर्गत नोंदणीदेखील केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात ‘नेचर्जी’चे पदार्थ सहज उपलब्ध व्हावेत, ही महत्त्वकांक्षा मनाशी ठेवत, मेहनत घेणार्या संपदा कानडे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!