नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशांतर्गत रोजगारनिर्मितीस चालना देण्यासाठी स्टार्टअप्स योजनेला प्रोत्साहन दिले आहे. या स्टार्टअपसच्या माध्यमातून देशात रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून सरकारकडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सद्वारे १५.५३ लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल याकरिता प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, सरकारने देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेमध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी तसेच स्टार्ट-अप आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत परिसंस्था तयार केली आहे. यानुसार पात्रता अटींद्वारे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत संस्थांना 'स्टार्टअप' म्हणून मान्यता दिली जाते. सरकारने ३० जूनपर्यंत १,४०,८०३ आस्थापनांना स्टार्टअप म्हणून मान्यता दिली आहे.
सन २०१६ पासून स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू झाल्यापासून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सनी १५ लाखांहून अधिक प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. विशेष म्हणजे दि. १६ जानेवारी २०१६ रोजी केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला होता.