मुंबई : देशात बेरोजगारी दरात घट झाली असून यंदा ३.२ टक्के इतकी नोंद दिसून आली आहे. पीएलएफएस संख्याशास्त्राच्या माध्यमातून देशभरातील रोजगारसंबंधीचा आढावा घेण्यात येतो. तसेच, रोजगार आणि बेरोजगार संबंधित अधिकृत माहितीचा स्रोत मिळविण्याकरिता नियमित श्रम बळ सर्वेक्षण केंद्रीय मंत्रालयाकडून २०१७-१८ पासून केले जात आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी दरवर्षी जुलै ते जून असा ग्राह्य धरण्यात येतो.
दरम्यान, अंदाजित कामगार लोकसंख्या प्रमाण(डब्ल्यूपीआऱ) ५६ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. एकंदरीत, देशातील रोजगाराबाबत सुधारणेचा कल असून बेरोजगारीचा दर वर्षागणिक कमी होताना दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)कडून प्रकाशित करण्यात आलेल्या (केएलईएमएस) देशभरातील रोजगारासंबंधीचा डेटा उपलब्ध होतो. मागील दशकभरात रोजगारात १७ कोटींनी वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी एकूण ५ योजना आणि उपक्रमांकरिता पॅकेज जाहीर केले आहे. या योजनेच्या माध्यमातून ५ वर्षांत ४.१ कोटी तरुणांसाठी रोजगाराला प्रोत्साहन, कौशल्यविकास आणि इतर संधींच्या विकासासाठी केंद्राने २ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पीएलएफएसच्या वार्षिक अहवालानुसार, अंदाजित कामगार लोकसंख्या प्रमाण आणि बेरोजगारीचा दर यांसदर्भात अधिकृत माहिती समोर आली आहे.