पावसाळा आणि आरोग्य निगा

    05-Aug-2024
Total Views |
rainy season and health

पावसाळ्यात अगदी चराचरातून बदल घडतो. सभोवताली तळे-नद्या ओसंडून वाहू लागतात. विविध रानभाज्याही याच कालावधीत बाजारात दिसू लागतात. वातावरणातील उष्णता कमी होते. एकूणच तापमानाचा पाराही घसरतो. पण, त्याचबरोबर साथीचे आजारही बळावतात. तेव्हा, पावसाळ्यात उद्भवणारे विविध आजार आणि घ्यावयाची काळजी यांविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया...

वसाळ्यात नैसर्गिकरित्या प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती ही थोडीफार मंदावते. त्यामुळे खूप जड अन्न खाल्ले की, अपचन होऊन पोटाच्या विविध तक्रारी सुरु होतात. त्याचबरोबर प्रतिकारशक्तीही थोडी मंदावते यामुळे ’chance infection'’चे प्रमाण वाढते. ’chance infection'’ म्हणजे शरीरात त्याची काही लक्षणे नसताना, संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात, संपर्कात आल्यामुळे होणारे इन्फेक्शन. हे पावसाळ्यात वाढण्याची दोन मुख्य कारणे आहेत. शरीराची कमी झालेली प्रतिकाराची ताकद आणि विविध जीवाणूंचे वाढलेले संसर्ग.

पावसाळ्यात सगळीकडेच पाणीच पाणी असते. रस्ते ओले, पावसात भिजल्यावर दिवसभर ओल्या कपड्यानेच प्रवास, कार्यालयातही तसेच दिवसभर बसणे, शेती-करणार्‍यांनाही साचलेल्या पाण्यातूनच भाताची रोपे लावावी लागतात. यामुळे पाण्याशी संपर्क आणि वातावरणातील वाढलेला दमटपणा हे विविध संसर्गजन्य आणि ’non-infectious disease’साठी पूरक वातावरण तयार होते. बरेचदा साठलेल्या पाण्यातून चालावे लागते. हे पाणी फक्त पावसाचेच असते, असे नाही. यात कचरा, सांडपाणी इत्यादीदेखील असते. संसर्ग होण्यासाठी सर्वाधिक कारणीभूत घटक म्हणजे, अशा दूषित पाण्याशी वारंवार येणारा संपर्क.

पिण्याच्या पाण्यातही बरेचदा गढूळ पाणी मिसळते. शुद्धीकरण करुनही काही वेळेस ते पाणी बाधते. म्हणजे दमट वातावरण आणि दूषित पाणी अशा मिश्रणामुळे पावसाळ्यात सर्वाधिक रोगराई बघायला मिळते. सर्दी-पडसं, फ्ल्यू, व्हायरल फिव्हर इ.ची साथ याच कारणांनी होते, वाढते, पसरते. संसर्ग झालेल्या व्यक्तीशी निरोगी व्यक्ती संपर्कात आली आणि त्याची प्रतिकारशक्ती मंदावलेली असेल, तर निरोगी व्यक्तीचेही आरोग्य बिघडू शकते (जरी अन्य कोणते ही रोगकारक कारण नसेल तरीही) लहान मुलांमध्ये याप्रकारे संसर्ग लवकर पसरतो. शाळांमधून सर्दी-पडसं झालेल्या मुलांचे प्रमाण या ऋतूत सर्वाधिक असते. तसेच, दाटीवाटीने राहणार्‍या वस्तीत, कमी जागेतील कार्यालयांमध्येदेखील अशाच पद्धतीने ’Chance Infection’चे प्रसरण (spread) खूप पटकन होते.

या गढूळ पाण्याचा जर त्वचेशी संपर्क आला, तर विविध त्वचाविकार बळावतात. गढूळ पाण्यातून चालणे, ओले मोजे दिवसभर पायात घालणे, ओली पादपात्रे घालणे इ.ने पायाची त्वचा कुजते. बोटांच्या पेरांमधून चिरा पडतात. त्या दुखतात, वाहतात. नखांमधून पाणी राहिल्याने नखेदेखील कुजतात, खराब होतात. दमट वातावरणाचा परिणाम त्वचेवर सर्वाधिक होताना दिसतो. कारण, बाह्य वातावरणाशी ओल्या पादत्राणांशी, कपड्यांशी त्वचेचा थेट संपर्क (Direct Contact) येतो. त्वचेचे विविध Fungal, Bacterial Infections यादरम्यान वाढतात. नायटा (Ring Worm, Infection), खकज (Scabies) गजकर्ण विविध Fungal Infections, Eczoma यांचे प्रमाण पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे खूप बळावते.

या सर्व त्वचाविकारांमध्ये त्वचेवर फोड येतात, त्वचेला खाज येते (अतिशय खाज), त्वचा लाल होते व खाजवून लस येते, आग होते. शरीरावर सुरुवात एका ठिकाणी होऊन ती लगेच शरीराच्या इतर ठिकाणी पसरते. Skin Folds जसे खाकेत (Armpits), स्तनांच्या खाली, गुप्तांगाशी व स्थूल व्यक्तींच्या मान-कंबरेशी असे Infection अधिक प्रमाणात होते. मेदस्वी व्यक्तींना बहुतांशी वेळेस घामही अधिक येतो. हा घाम Skin Folds जवळ साचतो व दमट वातावरणामुळे संसर्ग निर्माण करणार्‍या जीवाणूंची (Micro Organisms ज्यात विविध Fungal, Bacterial, Viral, Growth सगळ्यांचा समावेश आहे) वाढ एकदम झपाट्याने होते. अशा परिस्थितीत ओले कपडे अंगावर अधिक काळ राहिले, पाय बराच वेळ ओले राहिले, तर हे संसर्गजन्य व्याधी होण्याची शक्यता खूप वाढते.
Fungal infections, Ringworm Infection इ. चिवट स्वरूपाचे असतात. बरे झाल्यानंतरही त्यांचे वारंवार Episodes येतात (पुन्हा पुन्हा Infection होते.) त्यामुळे यांची चिकित्सा नेटाने पूर्ण करावी, अर्धवट सोडू नये. त्याचबरोबर शारीरिक स्वच्छतेवर अधिक लक्ष द्यावे. रोजच्या रोज स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी. ओले दमट कपडे अंगावर घालून वाळवू नयेत. सुती कपडे घालावे. खूप घाम येत असल्यास तो शरीरात जिरू न द्यावा. रूमालाने, स्वच्छ मऊ कापडाने पुसावा. घामट कपडे पुनःपुनः न धुता वापरू नये. एकाचे कपडे दुसर्‍याने घालू नये (Hostel मध्ये किंवा भावडांमध्ये हे अधिक होते.) घट्ट कपडे, सिन्थेटिक कपडे टाळावेत. अति तिखट, चमचमीत, मसालेदार अन्न खाऊ नये. याने घामाचे प्रमाण वाढते.

शरीरात पित्त वाढते. संसर्ग वाढण्यासाठी हे पूरक कारण ठरू शकते. अंघोळीनंतर अंग स्वच्छ पुसून घ्यावे. शरीरावर लव जर अधिक असली, तर त्यामध्ये दमटपणा राहू शकतो. संसर्ग वाढू शकतो. बरेचदा अंघोळीनंतर थेट अंगात कपडे घातले जातात, त्याच कपड्याने अंगावरील पाणी शोषले जाते. पण, ते कपडे दमट राहतात किंवा काही वेळेस, विशेषतः स्त्रियांमध्ये टॉवेल, पंचाऐवजी नेसलेली साडी वा परकर याने अंग पुसून मग ते धुवायला टाकायची सवय असते. ही आरोग्यकारक सवय नाही. हॉस्टेलमध्ये राहणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचे (स्त्री अथवा पुरुष) रोजच्या रोज टॉवेल अथवा नॅपकिन पंचा धुण्याची सवय नसते. दोन-चार दिवस एकच टॉवेल प्रत्येक वेेळेस वापरला जातो. रुम शेअरिंग असल्यास एकमेकांचे पंचे, टॉवेल्स सर्रास वापरले जातात. हेदेखील स्कीन इन्फेक्शन होण्याचे एक मोठे पूरक कारण आहे. औषधोपचारानेही इन्फेक्शन बरे झाले, तरी या सवयी तशाच राहिल्या, तर इन्फेक्शन पुन्हा होऊ शकते.

त्वचा कोरडी ठेवावी. कपडे कोरडे, स्वच्छ आणि सुती असावे. निम्बाचा व त्रिफळाचा वापर सर्व प्रकारच्या त्वचासंसर्गामध्ये उत्तमरित्या करता येतो. तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने त्याचा वापर करावा. स्थूल व्यक्तींमध्ये जसे इन्फेक्शन अधिक होण्याची शक्यता असते, तशी मधुमेही व्यक्तींमध्येही संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. ज्यांची रक्त शर्करा खूप अधिक आहे, ज्यांचे वजन अधिक आहे, ज्यांना खूप दिवसांपासून, वर्षांपासून मधुमेह आहे, अशांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

घरातून ओव्याची धुरी गुग्गुळाची + निम्बाची धुरी केल्यासही घरातील दमटपणा कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर, जंतुनाशकही गुण मिळतात. अति दमट वातावरणामुळे श्वसनाच्या तक्रारीदेखील वाढू शकतात. लसूण, आलं यांचा वापर आहारातून असावा. श्वसनाचे व्यायाम करावे. वेखंडाचा लेप करावा. वाफारा घ्यावा. या बद्दल सविस्तर पुढील लेखांतून वाचूया. (क्रमशः)
 
वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429