ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण मैत्री दिन साजरा केला. पण, अनेकांना मैत्र ‘जीवाचे’ नव्हेे, तर भावनिकदृष्ट्या ‘जीवघेणे’ही वाटते. अशा या भावनिक अलिप्ततेच्या हिंदोळ्यातील ‘मनोवाटा’ उलगडणारा लेख....
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपण इथे एकमेकांवर अवलंबून राहून जगतो. आपल्याला आवडो किंवा न आवडो, आपल्या जीवनात क्वचितच असा एक क्षण असेल, जेव्हा आपल्याला इतरांच्या कृतीचा फायदा होत नाही. निसर्गात आपण कधीही काहीही वेगळे पाहत नाही. परंतु, प्रत्येक गोष्ट त्याच्यासमोर, त्याच्या आजूबाजूस असलेल्या दुसर्या कशाशी तरी संबंधित आहे. या कारणास्तव, आपल्याला मिळणारा आनंद इतरांशी असलेल्या आपल्या नातेसंबंधांच्या संदर्भात मिळतो, हे काही आश्चर्यकारक नाही. मानवी ‘कनेक्शन’च्या सशक्त प्रभावाला कधीही कमी लेखू नये. तुम्हाला आयुष्यात दुसर्या अशा व्यक्तीची वारंवार गरज जाणवते, जी तुम्हाला पूर्णपणे समजून घेईल, तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि तुम्ही जसे आहात, त्याहून तुम्हाला सक्षम करण्यासाठी किंवा प्रेम वाटावे, यासाठी प्रयत्न करत असते. ती आई असेल, बहीण असेल, मित्रमंडळी असतील. पण, ते जरूर असतात. करुणेची संपूर्ण कल्पना या सर्व सजीवांच्या परस्परावलंबनाच्या तीव्र जाणीवेवर आधारित आहे, जे सर्व एकमेकांच्या अस्तित्वाचा भाग आहेत आणि सर्व एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत.
नातेसंबंध हे सर्वव्यापी आहेत. विश्वातील प्रत्येक गोष्ट केवळ अस्तित्वात आहे. कारण, ती इतर सर्व गोष्टींशी संबंधित आहे. एकांतात काहीही अस्तित्वात नाही. आपण याचा दुर्धर अनुभव ‘कोविड’च्या महामारीत घेतलेलाच आहे. आपल्याकडे सगळे असूनसुद्धा त्या अलिप्तपणामुळे आपण ठार वेडे झालो होतो. भावनिक अलिप्तता म्हणजे भावनिक पातळीवर इतरांशी संपर्क साधण्याची असमर्थता किंवा अनिच्छा. भावनिक अलिप्तपणाचा अर्थ असादेखील होऊ शकतो की, लोक त्यांच्या भावनांशी जुळत नाहीत, ज्याचा परिणाम म्हणजे या व्यक्ती इतर लोकांच्या भावनांपासून वारंवार संबंध तोडतात किंवा विभक्त होतात.
अलिप्तता म्हणजे स्वतः आणि बाहेरच्या जगामध्ये एक भिंत बांधण्यासारखेच. भावनिक अलिप्तता व्यक्तीच्या जीवनात व्यत्यय आणू शकते. सामाजिक, भावनिक आणि अगदी कामाच्या क्षेत्रांवर परिणाम करू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक नातेसंबंध तयार करणे किंवा ते सांभाळणे कठीण जाऊ शकते किंवा त्यांच्या भावना इतरांशी सामायिक करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते. भावनिक अलिप्तता ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. काही लोकांसाठी, भावनिकदृष्ट्या अलिप्त राहणे ही एक सामना करण्याची सवय आहे - एक असे हत्यार, जे त्यांना तणाव किंवा दुखापत होण्यापासून वाचवण्यासाठी ते वापरतात. इतरांसाठी ही आघात, गैरवर्तन किंवा प्रक्रिया न केलेल्या भावनांची प्रतिक्रिया असू शकते, ज्यामुळे व्यक्ती त्यांच्या संघर्षांबद्दल भावना आणि मत उघड करण्यास असमर्थ ठरते.
वचनबद्ध जिव्हाळ्याचा भागीदार असलेले जन हे जाणतात की, ते एकमेकांशी भावनिकरित्या जोडलेले राहणे किती महत्त्वाचे आहे. आयुष्यातील कठीण आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांचे एकसंघ बंधन टिकवून ठेवण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे त्यांचे सामर्थ्य. बर्याच भागीदारांकडे, दुर्दैवाने, आव्हानांचा सामना करण्यासाठी भिन्न कल्पना किंवा धोरणे असतात. जर ते त्यांचे अचूक अर्थ लावत नसतील, तर जेव्हा त्यांना एकरूप असण्याची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा ते वेगळे होऊ शकतात.
एकमेकांना अंतरंगातून ओळखणार्या जोडप्यांना त्यांचे भागीदार ते का आणि केव्हा सामना करणारी यंत्रणा कशी वापरतात, हे बरोबर समजते आणि त्यांच्या नातेसंबंधाला धोका असताना मतभेद असले, तरी त्यांना भावनिकरित्या जोडलेले राहू देतात. नातेसंबंध हे शेवटी सर्व आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट अस्तित्वात आहे, कारण ती इतर सर्व गोष्टींशी संबंधित आहे. एकांतात काहीही अस्तित्वात नाही. आपण एकट्याने आयुष्यात जगू जाऊ शकतो, असे भासवणे माणसाने थांबवले पाहिजे. मैत्री ही सर्वात जुनी आणि सर्वात आंतरिक मानवी जाणीवांवर आधारित आहे. जीवनात फक्त आपल्या एकट्यापेक्षा बरेच काही महत्त्वाचे आहे आणि आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे, ही जाणीव महत्त्वाची आहे.
भावनिक अलिप्तता काही परिस्थितींमध्ये उपयुक्त ठरू शकते, जर ती स्पष्ट उद्देशाने वापरली गेली पाहिजे - जसे की लोक तुमच्याबद्दल नकारात्मक गप्पा मारत असतील, तर त्याची काळजी न करणे. जर त्या अलिप्तपणात तुम्ही जास्त लक्ष दिले, तर जास्त चिंतेत जाल किंवा तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नसाल, तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला इतर लोकांशी संपर्क साधता येत नसेल किंवा तुम्हाला भावना व्यक्त करण्यात अडचण येत असेल, तर त्याचा तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. तथापि, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, भावनिक अलिप्तता हा केवळ एक ‘स्विच’ नाही, जो इच्छेनुसार चालू आणि बंद केला जाऊ शकतो. ती एकप्रकारची नकारात्मक किंवा त्रासदायक सवय एखाद्याला लागू शकते.
आजच्या आधुनिक सोयीसुविधांसह, एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या एकांतात जगू शकते. पण, ते अस्तित्व कदाचित भावनिकदृष्ट्या आनंदी नाही. लाखो वर्षांच्या नैसर्गिक मानवी मैत्रामुळे खरे तर अलिप्तता अजूनही वेदनादायक आहे. अलिप्तता जर आनंद देणारी नसेल, तर शारीरिक वेदनांमध्ये सामील असलेल्या मेंदूच्या अनेक भागांना सक्रिय करते. म्हणजेच त्यात क्लेश आहे, दुःख आहे.
अलिप्तता ही अशी स्थिती आहे, जिथे एखादी व्यक्ती वस्तू, लोक आणि परिणाम यांची आसक्ती सोडून देते. ही एक मानसिकता आहे, जी तुम्हाला एकांतात लोटू शकते. पण ती सकारात्मक आहे, की नकारात्मक ठरू शकते, हे पुढच्या लेखात पाहूया. (क्रमश:)
डॉ. शुभांगी पारकर