मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत; ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी!
05 Aug 2024 20:21:08
मुंबई : ओव्हर हेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि लोकल जागच्या जागी थांबल्याची घटना डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे मार्गावर घडली. दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला, स्थानकापासून काही अंतरांवर ही घटना घडल्याने सुदैवाने यात कोणलाही दुखापत झाली नाही. मात्र, मागील आठवड्यापासून सातत्याने मध्य रेल्वेच्या वाहतूक खोळंब्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार, दि.५ रोजी मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान मोठा आवाज होऊन ओव्हर हेड वायर तुटली आणि ट्रॅकवर पडली. स्फोट सारखा आवाज आल्याने थांबलेल्या जलद डाऊन मार्गावरील लोकलमधील प्रवासी घाबरल्याने ट्रेनमधून उतरून रुळावरून चालू लागले. ०५/०८/२०२४ रोजी दुपारी २.५५ वाजता ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली. यामुळे ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कल्याणकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल ट्रेन तब्बल एक तास रखडल्याने एका मागे एक अशा लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील यामुळे रखडल्या. तर ओव्हरहेडचा स्फोट ऐकून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर जाणाऱ्या लोकल ट्रेन मधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. लोकल ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांना मदत करत थांबलेल्या लोकल ट्रेन मधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. अनेक प्रवासी खाली उतरून रेल्वे रुळावरुन चालत पुढे गेले.
लोकलचे वेळापत्रक कोलमडले
अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणाऱ्या जलद लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. तर अप आणि डाऊन जाणाऱ्या स्लो लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. काही लोकल ट्रेन रद्दही करण्यात आल्या आहेत.