'मनसे'कडून दोन उमेदवारांची घोषणा

05 Aug 2024 16:00:51

Raj Thankre
 
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. बाळा नांदगावकर यांना शिवडी, तर दिलीप धोत्रे यांना पंढरपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सोमवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली.
 
बाळा नांदगावकर हे २००९ मध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये अखंड शिवसेनेच्या अजय चौधरी यांनी त्यांचा पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरता प्रचाराची धुरा सांभाळली होती.
 
आता पुन्हा एकदा मनसेच्या वतीने ते मैदानात असल्यामुळे उबाठाच्या अजय चौधरी यांच्यासमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे. महायुतीकडून कोण उमेदवार असेल, याबाबत अद्याप घोषणा झाली नसली, तरी भाजपकडून नाना आंबोले आणि शलाका साळवी इच्छुक आहेत.
 
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत. मनसेच्या दिलीप धोत्रे यांच्याशी त्यांचा सामना होईल. त्याशिवाय भगीरथ भालके आणि मविआकडून अभिजित पाटील मैदानात असतील. त्यामुळे मतविभाजन होऊन अवताडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल, असा कयास राजकीय विश्लेषकांकडून बांधला जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0