वंदे भारत हा रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा : पंतप्रधान मोदी
31-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देत अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस, मेरठ-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोइल या तीन मार्गांवर संपर्क सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर, रेल्वे गाड्यांमुळे उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये संपर्क सुविधा वाढणार आहे.
दरम्यान, हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेल्या मदुराई-बेंगळुरू, चेन्नई-नागरकोइल आणि मेरठ-लखनौ या तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांमुळे उत्तर ते दक्षिण भारताच्या विकासाच्या प्रवासात एक नवीन अध्याय लिहिला जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. देशातील वंदे भारत गाड्यांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करून देश विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले.
वंदे भारत म्हणजे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे नवे प्रतिक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. प्रत्येक शहरात आणि प्रत्येक मार्गावर वंदे भारताची मागणी होत असल्याचे सांगत, अतिवेगवान रेल्वेगाड्यांच्या आगमनामुळे लोकांमध्ये त्यांचा व्यवसाय, रोजगार आणि स्वप्ने पूर्ण करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले. आजमितीस देशभरात १०२ वंदे भारत रेल्वे सेवा सुरू असून ३ कोटींपेक्षा जास्त लोकांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे.