सिंधुदुर्गात सापडले 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे दुसरे दुर्मीळ जंगल; कुंब्रल बागवाडीकरांनी देवाचे नावे जपले जंगल

    31-Aug-2024
Total Views |
sindhudurg emyristica swamp



मुंबई (अक्षय मांडवकर) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील कुंब्रल गावात 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे दुर्मीळ जंगल आढळून आले आहे (sindhudurg myristica swamp). 'मायरिस्टिका स्वॅम्प'सारख्या दुर्मीळ जंगलाची ही महाराष्ट्रातील दुसरी नोंद आहे (sindhudurg myristica swamp). भालांडेश्वर देवस्थानाच्या ठिकाणी हे जंगल असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून कुंब्रलच्या बागवाडी ग्रामस्थांनी या जंगलाला देवाच्या नावाने जपले आहे. (sindhudurg myristica swamp)
 
 
भारतात केवळ तीन राज्यांमध्ये 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे जंगल आढळून येते. 'मायरिस्टिका स्वॅम्प'' ही गोड्या पाण्यातील दलदलीच्या जंगलाची परिसंस्था महाराष्ट्र केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अस्त्तिवात आहे. यापूर्वी जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील हेवाळे-बांबर्डे येथून पहिल्यांदा 'मायरिस्टिका स्वॅम्प'चा शोध लावण्यात आला होता. २०२१ साली या जंगलाला 'जैविक वारसा स्थळा'चा दर्जा देखील देण्यात आला होता. त्यानंतर आता तालुक्यातीलच कुंब्रल येथील बागवाडीमधून 'मायरिस्टिका स्वॅम्प'च्या दुसऱ्या जंगलाचा शोध लावण्यात आला आहे. तालुक्यातील वन्यजीव निरीक्षक प्रवीण देसाई, विशाल सर्डेकर आणि शीतल देसाई यांनी यासंदर्भातील शोध निबंध लिहिला असून हा निबंध 'जर्नल ऑफ थ्रेट्रेंड टॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये सोमवारी प्रकाशित झाला. 'नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन' आणि 'वानोशी फोरेस्ट होम स्टे'च्या माध्यमातून हा शोधनिबंध तयार करण्यात आला आहे.

 
 
'मायरिस्टिका स्वॅम्प' ही रान जायफळाची झाडे बहुसंख्याने असलेली गोड्या पाण्याची दलदल परिसंस्था आहे. ही परिसंस्था अत्यंत दुर्मीळ असून अशा परिसंस्थांचे वय साधारण १४० दशलक्ष वर्षे इतके आहे. कुंब्रलच्या बागवाडीतील भालांडेश्वराच्या देवस्थानामध्ये म्हणजेच देवराईमध्ये 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे जंगल आहे. ही देवराई ८ हजार २०० चौरस मीटर क्षेत्रामध्ये पसरलेली असून त्यामधील ७७० चौरस मीटर क्षेत्रामध्ये मायरिस्टिकाचे जंगल असल्याची माहिती प्रवीण देसाई यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. या देवराईत 'मायरिस्टिका मॅग्निफिका'ची (रान जायफळ) ७० झाडे असून या झाडांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधकांनी रान जायफळाखेरीच या देवराईमधून ३९ इतर प्रजातींच्या झाडांची देखील नोंद केली आहे. भालांडेश्वर हे शिवशंकराचे रुप असून गावकऱ्यांची त्यावर नितांत श्रद्धा आहे. म्हणूनच गावकऱ्यांनी 'मायरिस्टिका'च्या झाडांचे देखील संवर्धन केले आहे. या देवराईतून निघणाऱ्या पाण्याच्या स्त्रोताचा वापरही गावकरी पिण्यासाठी करतात.
 
 
'मायरिस्टिका स्वॅम्प'विषयी
उष्णकटिबंधीय क्षेत्रात गोड्या पाण्याच्या दलदलीच्या परिसरात 'मायरिस्टिका' प्रजातीच्या वृक्षांचे जंगल आढळते. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन फुलझाडांमध्ये या वनस्पतीचा समावेश होतो. जायफळाच्या जातीमध्ये 'मायरिस्टिका' वृक्षांचा समावेश होत असून त्यांना 'आययूसीएन' या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील 'धोकाग्रस्त' वृक्षांच्या यादीत स्थान दिले आहे. कांदळवनांसारखीच या वृक्षांची मुळे खोडापासून जमिनीच्या दिशेने विस्तारलेली असतात. सदाहरित असणाऱ्या या वृक्षांची घनदाट मुळे ओल्या गाळयुक्त काळ्या मातीत उभे राहण्याकरिता मदत करतात. 'मायरिस्टिका स्वॅम्प''ची ही परिसंस्था भारतात केवळ कनार्टकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यात, केरळमधील दक्षिणेकडील भागात आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी आढळून येते. त्यामुळे महाराष्ट्रात ही परिसंस्था आढळून येणे महत्त्वाचे आहे.