मुंबई : बदलापूरच्या घटनेनंतर राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे नॅरेटीव्ह विरोधकांकडून सेट केले जात आहे. परंतु, त्यांच्या काळात महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना, लॉकडाऊनमध्येही राज्यात दररोज १०९ महिलांवर अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) नुकताच आपला अभ्यास अहवाल सादर केला. त्यातून ही बाब उघडकीस आली. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर संपूर्ण देश ठप्प झाला. रस्ते, वाड्या, वस्त्या निर्मनुष्य असताना वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रात ३१ हजार ७०१ महिलांवर अत्याचार झाले. त्याची सरासरी प्रतिदिन ८८ दिवस इतकी आहे. २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आले. या वर्षात राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या तब्बल ३९ हजार २६६ वर पोहोचली. त्याची सरासरी १०९ घटना प्रतिदिवस इतकी आहे. जानेवारी ते जून २०२२ या काळात (महाविकास आघाडी सत्तेवर असेपर्यंत) महिला अत्याचाराच्या एकूण २२ हजार ८४३ घटना घडल्या. त्याची सरासरी १२६ घटना प्रतिदिवस इतकी आहे.
लैंगिक अत्याचाराचा कळस!
अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रयत्न (पॉक्सो कलम १२, भादंवि ५०९) या श्रेणीतील गुन्हे पाहिले, तर त्यात २०२१ पासून अचानकच मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. हे गुन्हे २०१७ मध्ये ९४, २०१८ मध्ये ४८, २०१९ मध्ये ९४, २०२० मध्ये ४८ इतके होते. २०२१ मध्ये ही संख्या २४९ वर पोहोचली. तर, २०२२ मध्ये ३३२ गुन्ह्यांची नोंद झाली. या काळात जून २०२२ पर्यंत राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकार होते आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते.
मुंबईच्या बाबतीत विचार केला, तर पॉक्सोच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबईत २०२० मध्ये ४४५ बलात्कार झाले. २०२१ या वर्षी ५२४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. तर, २०२२ मध्ये ही संख्या ६१५ वर गेली. २०२३ मध्ये ती कमी होऊन ५९० वर आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वर्ष महिला अत्याचाराच्या घटना प्रतिदिन (सरासरी)
२०२० ३१,७०१ (कोविड काळ) ८८ घटना
२०२१ ३९,२६६ (कोविड काळ) १०९ घटना
जानेवारी ते जून २०२२ २२,८४३ १२६ घटना
जुलै ते डिसेंबर २०२२ २०,८३० ११६ घटना