मुंबई : काँग्रेसचे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. दरम्यान, काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत जितेश अंतापूरकर यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. तसेच त्यानंतर क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. जितेश अंतापूरकर यांनी शुक्रवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती.
जितेश अंतापूरकर यांना अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जाते. राजीनामा दिल्यानंर शुक्रवारी सायंकाळी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यासोबतच नांदेड येथील जिल्हा परिषद सदस्य गणेश शिंपाळकर, पं. स. सभापती शिवाजीराव देशमुख, जि. प. सभापती माधवराव मिसाळे, माजी नगराध्यक्ष शंकरराव कंथेवार, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.