"काही लोकांना माझा राजीनामा..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका

    31-Aug-2024
Total Views |
 
Fadanvis
 
नागपूर : काही लोकांना माझा राजीनामा मागितल्याशिवाय अन्न पचत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांचे नाव न घेता केली आहे. शनिवारी, नागपूर येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतिने ८ वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "खरंतर मी गृहमंत्री आहे. पण पोलिस पाटील सुद्धा आपल्या गावचे गृहमंत्रीच असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तुमचासुद्धा मोलाचा वाटा आहे.खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करत असताना शिव्याच जास्त खाव्या लागतात. काही लोकांना तर सकाळी उठल्यावर कॅमेऱ्यावर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय अन्नच पचत नाही. एखाद्या दिवशी जर त्यांनी राजीनामा मागितला नाही तर त्यांना अपचन होतं," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची सभा!
 
ते पुढे म्हणाले की, "पोलिस पाटील संघटना ही अशी संघटना आहे ज्यांनी मागे लागून काम तर करून घेतलंच पण कुणी काम केलं हे ते विसरले नाहीत. त्यामुळेच त्यांनी मला इथे बोलवून माझा सत्कार केला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काळाच्या ओघात व्यवस्था बदलली. लोकशाहीमध्ये अनेक संस्था तयार झाल्या. या सगळ्यामुळे मानाच्या पदाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे का? अशी शंका निर्माण होत होती. त्यातूनच अनेकदा पोलिस पाटील संघटनेचे लोक मला भेटायचे आणि त्यांची व्यथा सांगायचे," असेही ते म्हणाले.