लाडकी बहिण योजना आणून आम्ही काही चूक केली का? फडणवीसांचा सवाल

    31-Aug-2024
Total Views |
 
Fadanvis
 
नागपूर : लाडकी बहिण योजना आणून आम्ही काही चूक केली का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महिलांना केला आहे. तसेच ही योजना सुरु ठेवायची की, नाही? असाही सवाल त्यांनी केला. शनिवारी, नागपूरात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आतापर्यंत जवजवळ १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये सरकारने जमा केले आहेत. ही योजना सुरु झाली त्यावेळी कुणाच्याच खात्यात पैसे जाणार नाही, १० टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाहीत, अशा वल्गना काँग्रेस आणि मविआचे नेते करत होते. पण त्यांनी आमच्या बहिणींना विचारावं, त्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही दुषणं दिली तरी आमच्या बहिणींच्या खात्यात आम्ही पैसे पोहोचवले आहेत."
 
हे वाचलंत का? -  राजकोट पुतळा प्रकरणात चेतन पाटीलला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी!
 
"आम्ही लाडकी बहिण योजना आणून काही चूक केली का? ही योजना सुरु ठेवायची आहे का? मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज, महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत, गुलाबी रिक्षा, शुभमंगल विवाह योजना, लेक लाडकी योजना, १ रुपयात पीक विमा या सगळ्या योजना सुरु ठेवायच्या की नाही?" असा सवाल त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "राजकारणात वेगवेगळे पक्ष असून शकतात पण लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले आहेत. हे अनिल वडपल्लीवार नाना पटोले आणि विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते. तसेच ते सुनील केदारांचे राईट हँड म्हणून ओळखले जातात. ते कोर्टात गेले आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणाले.पण जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे तोपर्यंत आम्ही हायकोर्टात मोठ्यात मोठा वकिल उभा करू. आम्हाला या राखीची आण आहे. काहीही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही. पण बहिणींनो यांची नियत समजून घ्या," असेही ते म्हणाले.