नागपूर : माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या काटोलमध्ये शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली. यावेळी त्यांनी लाडकी बहिण योजनेची माहिती देत महिला सुरक्षेवरही भाष्य केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "आज देशात आणि काही राज्यांमध्ये होत असलेला महिलांवरील अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे. त्याला माफी नाही. कुणीही दोषी असला, कितीही श्रीमंत बापाचा असला तरी त्याला सोडणार नाही. सरकार येतील सरकार जातील, ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेलं नाही. पण महिलांच्या सुरक्षेबाबात कोणालाही पाठीशी घातली जाणार नाही. महिलांच्या सुरक्षेला आमचं सर्वोच्च प्राधान्य राहणार," असे आश्वासन त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, "जो कुणी महाराष्ट्रातील माय माऊलींकडे वाकड्या नजरेने बघेल, त्याचा गुन्हा सिद्ध झाला की, त्याला सरळ फाशी देण्यात येईल. ही विकृती आहे. अशी माणसं समाजात नकोत. माणुसकीला काळीमा फासणारी ही जमात असून त्यांचा बंदोबस्त करायचा आहे. विरोधक काही ना काही राजकारण करतात. पण ही राजकारण करण्याची जागा नाही. आपण निवडणूकीला राजकारण करू. परंतू, समाजात जातीय सलोखा ठेवणं, एकी ठेवणं आणि धर्माधर्मात वाद न होऊ देणं हे आपलं काम आहे," असेही ते म्हणाले.