नवी दिल्ली : शरद पवार यांना आजपासून (शुक्रवार) झेड प्लस सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली असून यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे त्यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवाररांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देऊ केली होती. त्यानंतर शुक्रवारी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी यासंदर्भात एक आढावा बैठक पार पडली. दरम्यान, शरद पवार ही सुरक्षा घेणार की, नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता त्यांना आजपासूनच झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झेड प्लस सुरक्षेतील काही अटी शरद पवारांना मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते ही झेड प्लस सुरक्षा नाकारण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.