मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Samanvay Baithak Kerala ) केरळच्या पलक्कड येथे शनिवार, दि. ३१ ऑगस्ट पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय (३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर) अखिल भारतीय समन्वय बैठक आयोजित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी शुक्रवारी अहल्या केंपस, पलक्कड येथे झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी बैठकीत विचारात घेतल्या जाणाऱ्या विषयांची माहिती दिली. राष्ट्रीय आणि सामाजिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? : मंदिरांमध्ये गैर-हिंदूंना नोकऱ्या देऊ नयेत!सुनील आंबेकर म्हणाले की, संघ वेळोवेळी आपल्या कार्याचा आढावा घेत राहतो आणि आपल्या कार्याचा विस्तार करण्याच्या योजना आखत असतो. हे संघशताब्दी वर्ष डोळ्यासमोर ठेवून आपले सामाजिक कार्य अधिक गतीने करण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. याकरिता पंचपरिवर्तनावर भर दिला जाणार आहे. यात समविचारी संघटना काय सहकार्य करू शकतात यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार आहे. राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांच्या संदर्भात सध्याची परिस्थिती, अलीकडील महत्त्वाच्या घटना आणि सामाजिक बदलाच्या इतर आयामांवरील योजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सहा सह-सरकार्यवाह आणि इतर प्रमुख अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ यासह ३२ संघप्रणित संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटन मंत्री आणि प्रमुख अधिकारी असे एकूण २३० कार्यकर्ते बैठकील उपस्थित असतील. तर संघाकडून ९० केंद्रीय अधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. केरळमध्ये संघाची समन्वय बैठक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सुनील आंबेकर यांनी सांगितले.