पोपच्या अस्थानी करूणेची कीव

    30-Aug-2024
Total Views |

Pope Francis
 
जगातील ५७ मुस्लीम देशांपैकी एकही देश मुस्लीम निर्वासितांना स्वीकारण्यास का तयार नाही? ज्या युरोपीय देशांनी यापूर्वी या निर्वासितांना आश्रय दिला, त्या देशांतील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती खालावली आहे, हे पोप फ्रान्सिस यांना दिसत नाही काय? म्हणूनच त्यांनी निर्वासितांना आश्रय देण्याचे औदार्य काही मुस्लीम देशांनीही दाखवावे, असे आवाहन करायला हवे होते.
 
रोमन कॅथलिक ख्रिस्ती धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी आफ्रिका व मध्य-पूर्वेतील मुस्लीम निर्वासितांबद्दल कळवळा व्यक्त केला असून, या निर्वासितांना आपल्या देशातून बाहेर काढणे किंवा त्यांना आपल्या देशात येऊ न देणे, हे महापाप असल्याचे वक्तव्य नुकतेच केले. आपल्या साप्ताहिक भाषणात त्यांनी प्रामुख्याने युरोपियन देशांना या निर्वासितांना वार्‍यावर न सोडण्याचे आवाहन केले आहे. एक धर्मगुरू या नात्याने त्यांना निर्वासितांबद्दल वाटणारा कळवळा समजता येण्यासारखा असला, तरी आजच्या जगातील कठोर राजकीय वास्तवाकडे दुर्लक्ष करणे, या देशांच्या सरकारांना परवडणारे नाही. खरे म्हणजे, या वास्तवाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोप फ्रान्सिस यांची ही उदारवृत्ती ही अस्थानी व्यक्त झाली आहे.
 
आपल्या देशातील अराजकता आणि धोकादायक सामाजिक स्थितीमुळे सुरक्षित आणि समृद्ध जीवनाच्या आशेसाठी आफ्रिकेतील तसेच लेबॅनॉन, पॅलेस्टाईन वगैरे पश्चिम आशियातील अनेकजण युरोपियन देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी धडपडत आहेत. हे निर्वासित आपले सर्वस्व मागे सोडून नेसत्या कपड्यांनिशी छोट्याछोट्या बोटींमधून भूमध्य समुद्र ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी बर्‍याचशा बोटी या समुद्रातच बुडतात आणि निर्वासितांचे बळी घेतात. काही वेळा वाळवंटी प्रदेशातून हे निर्वासित प्रवास करतात आणि तेथील भीषण उष्णतेला बळी पडतात. वरकरणी ही स्थिती कितीही हृदयद्रावक दिसत असली, तरी या निर्वासितांना आश्रय देणार्‍या देशांतील सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती काही वर्षांनंतर किती धोकादायक झाली आहे, ते सध्या जगाला दिसत आहे. एकेकाळी शांत, सुरक्षित आणि समृद्ध जीवन जगणारे फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, फिनलंड, बेल्जियम, स्वीडन, स्वित्झर्लंड वगैरे अनेक युरोपीय देश हे सध्या सामाजिक अशांतता आणि हिंसाचाराने ग्रस्त झाले आहेत. या स्थितीस या देशांनी काही वर्षांपूर्वी उदार मनाने आश्रय दिलेल्या या गरीब आफ्रिकी आणि पश्चिम आशियाई देशांतील मुस्लीम निर्वासित जबाबदार आहेत, हे दिसून येते. लंडनसारख्या जगप्रसिद्ध शहराच्या काही भागांत आजघडीला शरियाच्या कायद्यांचा अंमल चालतो, ही वस्तुस्थिती. ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही काही मतदारसंघांमध्ये या अल्पसंख्य मुस्लीम मतदारांनी आपला प्रभाव दाखवून दिला आहे. मजूर पक्षाचे अनेक उमेदवार हे मुस्लिमांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊनच निवडून आले आहेत.
 
काही वर्षांपूर्वी या युरोपीय देशांतील जनतेची मन:स्थितीही पोप महाशयांसारखीच उदार होती. म्हणूनच, त्यांनी भविष्याचा फारसा विचार न करता पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील काही देशांतील हजारो निर्वासितांना आपल्या देशात आश्रय दिला होता. या निर्वासितांच्या दोन पिढ्या आता या देशांमध्ये नांदत असल्या, तरी ते या देशांमध्ये सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या समरस झालेले नाहीत. उलट, त्यांनी आपली स्वतंत्र ओळख अधिक धारदार केली आहे आणि ती त्या देशांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न चालविला आहे. फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया वगैरे देशांतील सामाजिक अशांतता आणि वाढता हिंसाचार हा याच प्रयत्नांचा परिपाक आहे. या देशांतील ख्रिस्ती धर्मीयांच्या भावना पोप यांना समजत नाहीत का?
 
युरोपातील अनेक देशांमध्ये गेल्या काही वर्षांत उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी- खरे म्हणजे त्यांना राष्ट्रवादी विचारसरणीचे पक्ष म्हणावे लागेल- निवडणुकीत भरघोस यश संपादन केले आहे. फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत मारी ली पेन यांच्या राष्ट्रवादी विचारांच्या पक्षाने सर्वाधिक जागी विजय मिळविला होता. पण, त्यांना स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. मात्र ऑस्ट्रिया, इटली तसेच पोलंड यासारख्या देशांची सत्ता गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेत्यांच्या हाती गेली आहे. हे कशाचे लक्षण मानायचे? कारण, या देशांतील जनतेला या निर्वासितांना आश्रय दिल्याचा दाहक अनुभव सोसावा लागला आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या मूळ संस्कृतीला आणि भूमिपुत्रांना प्रोत्साहन देणार्‍या या राष्ट्रवादी विचारांच्या पक्षांकडे युरोपीय समाज वळू लागला आहे.
 
फार काय व्हॅटिकन सिटी या टीचभर भागाला स्वतंत्र देशाचा दर्जा देणार्‍या इटलीने तरी अशा किती निर्वासितांना आश्रय दिला आहे? या निर्वासितांना आश्रय देण्यास पोप महाशय इटलीच्या सरकारला भाग पाडू शकत नसतील, तर अन्य युरोपियन देशांकडे त्यासाठी आग्रह धरण्याचा त्यांना काय अधिकार? या मुस्लीम निर्वासितांना जगातील ५७ मुस्लीम देशांमध्ये आश्रय घ्यावासा का वाटत नाही आणि हे मुस्लीम देशही या निर्वासितांना आपल्या देशात का आश्रय देत नाहीत, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पोप महाशयांनी या मुस्लीम देशांनी या निर्वासितांना सामावून घेण्याचे आवाहन केले असते, तर ते अधिक संतुलित झाले असते.
मुस्लीम निर्वासित हे त्यांच्या अत्यंत दयनीय परिस्थितीतही प्रथम मुसलमान असतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. पश्चिम आशियातील लेबेनॉनसारखा छोटा देश हा ख्रिस्तीबहुल होता. तेथे युरोपियन संस्कृती आणि स्वातंत्र्य नांदत होते. त्या देशाची राजधानी असलेल्या बैरूत या शहराला तर आशियातील पॅरिस म्हटले जात असे. अशा या देशात अरब-इस्रायल संघर्षाचा लाभ उठवून लगतच्या सीरिया, पॅलेस्टाईन आणि इजिप्तमधील निर्वासितांनी आश्रय घेतला आणि अवघ्या २० वर्षांत लेबेनॉन हा इस्लामी देश बनला. तेथील ख्रिस्ती धर्मीय हे अल्पसंख्यच बनले असे नव्हे, तर ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हा गेल्या ५०-६० वर्षांचा इतिहास आहे. अशीच स्थिती आफ्रिकेतील काही देशांमध्ये दिसून येते. आता स्वीडन किंवा बेल्जियम हा युरोपमधील पहिला मुस्लीम देश ठरेल, असे भाकितही काही समाजशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. यावरून राजकीय नेते आणि पोप फ्रान्सिस यांच्यासारखे धार्मिक नेते यांनी बोध घेतला नाही, तर युरोपचे भवितव्य अंधकारमय असेल, हे उघडच दिसते.