पालघर : सिंधुदुर्गमध्ये जे झालं त्यासाठी मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी डोकं ठेवून त्यांची माफी मागतो, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. शुक्रवारी वाढवण बंदराच्या उद्धाटन कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून ते आमचे आराध्य दैवत आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या मनातील भावना व्यक्त करू इच्छितो. २०१३ मध्ये जेव्हा पंतप्रधानपदासाठी माझं नाव निश्चित केलं त्यावेळी मी सर्वात आधी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर प्रार्थना केली होती. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी राष्ट्रसेवेच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात केली होती. माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नसून ते आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मागील दिवसांत सिंधुदुर्गमध्ये जे झालं त्यासाठी मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी डोकं ठेवून त्यांची माफी मागतो."
हे वाचलंत का? - वाढवण बंदरामुळे पुढची ५० वर्षे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहणार!
"आमचे संस्कार वेगळे आहेत. प्रत्येक दिवशी भारतमातेचे महान सुपुत्र असलेल्या वीर सावरकरांचा अपमान करणारे आम्ही लोकं नाहीत. वीर सावरकरांचा अपमान केल्यानंतरही जे माफी मागायला तयार नाहीत आणि ज्यांना याबद्दल पश्चातापही होत नाही, त्यांच्या संस्कारांविषयी महाराष्ट्रातील जनतेने समजून घ्यावं. जे लोकं छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतात त्यांचीसुद्धा मी माफी मागतो. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवताशिवाय दुसरं काहीच मोठं नाही," असेही ते यावेळी म्हणाले.