मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP Hindu Sammelan) "राष्ट्रीय चरित्र ठीक करण्याची आज गरज आहे. आपण समाजात करत असलेले कार्य राष्ट्रहिताच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, हा विचार करण्याची आवश्यकता आहे. हिंदू हिताचा विचार करणारे सत्तेत असणे महत्त्वाचे आहे. देशाचे हित हिंदूंच्या हातात आहे. देश टिकवायचा असेल तर हिंदूत्व प्रबळ करावं लागेल.", असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले.
विश्व हिंदू परिषद स्थापनेच्या षष्ठीपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात प्रखंड स्तरावर हिंदू संमेलनं आयोजित केली जात आहेत. गुरुवार, दि. २९ ऑगस्ट रोजी यशवंत भवन, प्रभादेवी येथे विहिंपच्या तुलसी नगर प्रखंडाच्या वतीने हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर डॉ. रुपाली नाईक, सीए एड. मिलिंदकुमार गुप्ता, विहिंप दादर जिल्हा मंत्री इंद्रजीत तिवारी उपस्थित होते.
मिलिंद परांडे यावेळी म्हणाले, षष्ठीपूर्तीच्या निमित्ताने देशभरात प्रखंड स्तरावर एकुण ८ हजार जागांवर हिंदू संमेलनं होत आहेत. विहिंपचे एकुण ३३ देशात कार्य सुरू आहे. ४५०० होऊन अधिक सेवा कार्य, सेवा प्रकल्प सध्या सुरू आहेत. लाखो लोक याचे लाभार्थी आहेत. भारतात प्रत्येक जिल्ह्यात सेवा कार्य पोहोचावे हा यंदाचा संकल्प आहे.
अखंड भारताविषयी उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, हिंदूंची दृष्टी ही समरसतेची असली पाहिजे. हिंदू रक्षणाचे व्रत प्रत्येकाने घ्यायला हवे. हिंदू संस्कार प्रतिष्ठित करणे सर्वात महत्त्वाचे आहे. समाजात याचे स्मरण व आचरण व्हायलाच हवे. धर्माच्या आधारे होणारे विभाजन आजही आव्हान म्हणून आपल्यासमोर आहे. त्यासाठी अखंड भारताचे स्वप्न प्रत्येक हिंदूने पाहिले पाहिजे.