मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jamaat-e-Islami) बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने इस्लामिक कट्टरतावादी जमात-ए-इस्लामीवर घातलेली बंदी उठवली आहे. त्यासोबतच जमातच्या विद्यार्थी संघटनेवरूनही बंदी उठवण्यात आली आहे. या दोन संघटनांविरुद्ध दहशतवादाचा कोणताही पुरावा नसल्याचे युनूस सरकारचे म्हणणे आहे. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या सत्तापालटात जमातचा मोठा हात आहे. बांगलादेशच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांनी ऑगस्ट महिन्यात त्यावर पूर्णपणे बंदी घातली होती.
हे वाचलंत का? : बांगलादेशी चालवत असलेल्या किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटचा पर्दाफाश!
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने बुधवारी (२८ ऑगस्ट) जमात-ए-इस्लामी बांगलादेश आणि तिची विद्यार्थी संघटनेवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात आदेशही जारी करण्यात आला आहे. आदेशात म्हटल्याप्रमाणे, बांगलादेश जमात-ए-इस्लामी आणि तिची विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र शिबीर यांचा दहशतवाद आणि हिंसाचारात सहभाग नाही. तसा कुठलाही ठोस पुरावा नाही. या संघटना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी नसल्याचा सरकारचा विश्वास आहे, त्यामुळे या आदेशावरील बंदी उठवण्यात आली आहे.
शेख हसीना सरकारने जमातवर सरकार अस्थिर केल्याचा आरोप केला होता. काही दिवसांनी शेख हसीना यांनाही राजीनामा द्यावा लागला. यानंतर जमात-ए-इस्लामीने खुली पत्रकार परिषदही घेतली. सध्या बांगलादेशातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जमातचे मोठे नेतेही हस्तक्षेप करत आहेत. युनूस सरकारमध्ये जमात विचारसरणीच्या लोकांनाही सामील करण्यात आले आहे.