पालघर : वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले. वाढवण हे आपल्या देशातील सर्वात मोठं बंदर असेल, असेही ते म्हणाले. शुक्रवारी पालघरमध्ये वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आजचा दिवस महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासातला सोनेरी दिवस आहे. वाढवण बंदर प्रकल्प हा गेमचेंजर प्रकल्प आहे. याचा फायदा संपूर्ण देशाला आणि पालघरच्या जनतेला होणार आहे. २०२९ पर्यंत या बंदराचा पहिला टप्पा पूर्ण होणार असून मोदीजींच्या हस्तेच या प्रकल्पाचे लोकार्पण होईल. खरंतर, गेल्या ३०, ४० वर्षांपासून वाढवण बंदर आज बनेल, उद्या बनेल, असं वाटायचं. परंतू, त्याला योगायोग लागतो. मोदीजींची दुरदृष्टी आणि नेतृत्वामुळे आज या बंदराचे भूमिपूजन झाले आहे. या बंदरासाठी केंद्र सरकारने ७६ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे."
हे वाचलंत का? - मोठी बातमी! छत्रपती शिवाजी महाराज राजकोट पुतळा प्रकरणात पहिली अटक
"वाढवण हे आपल्या देशातील सर्वात मोठं बंदर असेल. या बंदरामुळे जगातील टॉप १० कंटेनर पोर्ट देशाच्या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे. ही आपल्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. डहाणू-पालघर जगाच्या नकाशावर महत्वाचं मिळवणार आहे. महाराष्ट्रासाठी हा भाग्याचा क्षण आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरणार आहे. या बंदरामुळे आयात आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल. राज्याच्या आणि देशाच्या अर्थकारणाला चालना मिळेल. भारत जागतिक व्यापारातही अधिक समर्थपणे उतरु शकेल. १२ लाखांपेक्षाही अधिक रोजगार मिळतील आणि इथल्या स्थानिकांना व्यवसाय मिळेल. तसेच सरकारने स्थानिक तरूणांना स्पेशल ट्रेनिंग देणारे ३० कार्यक्रम निश्चित केले आहेत. वाढवण बंदर विकासात आम्ही मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचं हित पाहणार आहोत. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. यात पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याचीही काळजी आपण घेतो आहे," असेही ते म्हणाले.