आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटायझेशनने अवघे विश्व व्यापलेले. मग वाचनसंस्कृतीही त्याला अपवाद नाही. म्हणूनच कागदी पुस्तकांनी आता मोबाईल, लॅपटॉपवरही ‘ई-बुक्स’च्या माध्यमातून प्रवेश केला. एकूणच वाचकांचे स्वरूप वेगाने बदलत असल्यामुळे, ग्रंथालयांनाही अधिकाधिक वाचकाभिमुख होण्यासाठी डिजिटायझेशन करणे भाग पडते. त्यामुळे अनेक ग्रंथालयांचे ‘डिजिटायन’ सुरु झाले आहे, तर काही ग्रंथालयांमध्ये याविषयीची चर्चा अद्याप प्राथमिक पातळीवर आहे. त्यानिमित्ताने डिजिटायझेशन प्रक्रियेत ग्रंथालयांची भूमिका, त्यासाठीचे प्रयत्न आणि निधी-सामग्री, वाचकांवरील परिणाम, याविषयी मुंबई आणि पुण्यातील काही ग्रंथालयातील प्रमुखाचे दै. ‘मुंबई तरुण भारत’ने जाणून घेतलेले हे विचार...
आमच्या ग्रंथालयाचे आम्ही एक संकेतस्थळ सुरु केले आहे आणि त्यावर ग्रंथालयाचे डिजिटायझेशन कशा प्रकारे केले गेले आहे, याची माहिती उपलब्ध आहे. ‘आरएफआय’ (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) आणि थ्रीडी प्रिंटर’ अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आम्ही ग्रंथालयात केलेला आहे. जवळपास ११०० पुस्तके आणि २० हजार पृष्ठांचे डिजिटायझेशन आतापर्यंत करण्यात आले आहे. हे सगळे नवे प्रयोग फक्त ग्रंथालयांच्या पातळीवर होत नाहीत; तर ते वाचकांपर्यंत पोहोचवलेसुद्धा जात आहेत. दर शनिवारी ३५ ते ४० वाचकांना एकत्र करून ग्रंथालयांमध्ये डिजिटली काय काय बदल करण्यात आलेले आहेत, ऑनलाईन पुस्तके कशी शोधायची, याचे प्रशिक्षण ग्रंथालयातर्फे वाचकांना दिले जाते. या डिजिटायझेशनमुळे वाचकवर्ग कमी होणार नाही, तर आणखी वाढेल. ऑनलाईन पुस्तके सहज उपलब्ध झाल्यामुळे वाचकही ती वाचतील; पण ज्या वाचकांना आणि विशेषत: संशोधकांना त्यासंदर्भात अधिक पुस्तके वाचायची आहेत, ते ग्रंथालयात येऊन ती वाचतील. बाहेरच्या देशांतील ग्रंथालयांमध्ये वाचकांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. आपल्याकडेही तसे उपक्रम होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे डिजिटल प्रयत्न वाचक आणि वाचन संस्कृतीसाठी फायदेशीरच आहेत.
डॉ. संदीप बावसार, ठाणे, मराठी ग्रंथसंग्रहालय
डिजिटल प्रयत्न वाचक आणि वाचनसंस्कृतीसाठी फायदेशीर

डिजिटल चळवळ छोट्या ग्रंथालयांपर्यंत लवकर पोहोचणे गरजेचे
आमच्याकडे अजून तरी काही डिजिटल करण्यात आलेले नाही. ही डिजिटल चळवळ मोठ्या ग्रंथालयांपासून सुरू झालेली आहे. सगळी शासकीय ग्रंथालयेसुद्धा अजून डिजिटल झालेली नाहीत. ही चळवळ केंद्रीय ग्रंथालये, विभागीय ग्रंथालये आणि जिल्हा ग्रंथालये अशा टप्प्यांनी सुरू आहे. त्यामुळे सगळ्याच ग्रंथालयांचे डिजिटायझेशन व्हायला वेळ लागणार आहे. अजून बर्याच ग्रंथालयांमध्ये संगणकसुद्धा उपलब्ध नाहीत. पण, हे डिजिटायझेेशन लवकर होणे खूप गरजेचे आहे. शासकीय ग्रंथालयांमध्ये वापरले जाणारे ‘ई-पुस्तकालय’ हे सॉफ्टवेअर जिल्हा विभागातील ‘अ, ब, क, ड’ अशा सर्व श्रेणींतील ग्रंथालयांना मिळणे आवश्यक आहे. हे डिजिटायझेशन जेव्हा होईल तेव्हा ते मोफत नसेल; कारण ग्रंथालयांना त्यांची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी सगळ्या सुविधा मोफत देता येणार नाहीत. आताच्या काळात वाचकवर्ग कमी झाला आहे. कोरोनानंतर तर त्यात खूप मोठी घट झाली आणि त्याचा फटका ग्रंथालयांना बसला आहे. त्यामुळे वाचकवर्गाला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी डिजिटायझेशन खूप गरजेचे आहे. या डिजिटायझेशनमुळे वाचनसंस्कृतीला कुठलाही धोका उद्भवणार नाही. कारण, प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचणारा जो वर्ग आहे तो कायम राहणार. स्पर्धा परीक्षा देणारी मुलेसुद्धा सगळ्या ऑनलाइन सुविधा उपलब्ध असून प्रत्यक्ष पुस्तक समोर ठेवून वाचण्यालाच अधिक पसंती देतात.
दिलीप भिकुले, ग्रंथपाल,सिद्धार्थ ग्रंथालय, पुणे
डिजिटायझेशन गरजेचे, पण निधीचा प्रश्न कायम
प्रत्येक वर्षी ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या वाढत जाते; त्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण होतो. ही पुस्तके जर डिजिटली स्कॅन करून ठेवली गेली, तर जागेचा प्रश्न उद्भवणारच नाही. आमचेही डिजिटायझेशनच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत, पण त्यासाठी लागणारा निधी मिळवणे हा जसा अनेक ग्रंथालयांसमोरील प्रश्न असतो, तसा तो आमच्या समोरही आहे. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मदतीने आम्ही काही पुस्तके स्कॅन करून घेतली आहेत; पण त्यांच्याकडेही मोठी पुस्तके स्कॅन करण्यासाठी स्कॅनर उपलब्ध नसल्यामुळे त्या पुस्तकांच्या स्कॅनिंगचा प्रश्न सुटलेला नाही. पण, आमचे प्रयत्न सुरू आहेत. डिजिटायझेशन होणे ग्रंथालय, वाचकांसोबतच प्रकाशकांच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचे आहे. कारण, पूर्वी प्रकाशक मुद्रित पुस्तकांचे प्रकाशन करायचे; त्यावेळी पुस्तकांचा खपही खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा. पण, आता तेवढा खप होत नाही. प्रकाशकांनाही तोटा होतो. त्यामुळे पुस्तके डिजिटली प्रकाशित करणे त्यांना अधिक फायद्याचे वाटते.
हेमंत भालेकर, अध्यक्ष, डेव्हिड ससून लायब्ररी
डिजिटायझेशनचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होणार
डिजिटायझेशनला आमच्याकडे सुरुवात झालेली आहे. जवळपास २७०० पुस्तकांचे आम्ही डिजिटायझेशन केलेले आहे. पण, त्याचा जो पुढचा टप्पा असतो; कीवर्ड घेऊन पुस्तके शोधणे तो अजून आम्ही गाठलेला नाही. त्यामुळे सभासदांपर्यंत किंवा वाचकांपर्यंत आम्हालाही डिजिटाईज केलेली पुस्तके पोहोचवता आलेली नाही. त्यादिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे डिजिटायझेशन जेव्हा होईल तेव्हा त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम दिसतील. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर ज्यांना वाचनाची आवड आहे; पण ग्रंथालयात येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी घरी बसून डिजिटल प्रत वाचणे सोयीचे असेल. पण, डिजिटायझेेशन समजून घेण्यास अवघड असल्यामुळेच त्यांना ते अडचणींचेसुद्धा जाऊ शकते. तरुण पिढीला हे नवीन तंत्रज्ञान वापरणे अवघड जाणार नाही, त्यामुळेच त्यांच्यासाठी ते सोयीचेच असेल. डिजिटायझेशन झाले तरी प्रत्यक्ष ग्रंथालयात येऊन पुस्तके वाचणार्यांची संख्या कमी होणार नाही.
सुधीर इनामदार, कार्यवाह, पुणे मराठी ग्रंथालय, पुणे
डिजिटायझेशनमुळे जुन्या पुस्तकांचेजतन शक्य
डिजिटायझेशनची आमची स्वतंत्र टीम आहे. आम्ही ‘विकिपीडिया कॉमन्स’ या संस्थेसोबत त्यासाठी काम करत आहोत. आतापर्यंत आम्ही १२०० पुस्तके डिजिटली स्टोअर केलेली आहेत. आमच्या ग्रंथालयासोबत आम्ही इतर अनेक ग्रंथालयांची पुस्तकेही डिजिटाईज केलेली आहेत. मुख्य म्हणजे, यासाठी आम्ही कुणाकडून कुठलेही पैसे घेतलेले नाहीत, हा सगळा खर्च आमची संस्था करते. जुनी जी पुस्तके आहेत; ज्यांचे पुनर्मुद्रण शक्य नाही, अशी पुस्तके डिजिटली स्टोअर करूच ठेवणे खूप गरजेचे आहे आणि तेच आम्ही करतो. त्यामुळे ही दुर्मीळ पुस्तके वाचकांना उपलब्ध होतात. या डिजिटायझेशनमुळे वाचनसंस्कृतीला कोणताही धोका नाही. उलट, ती वृद्धिंगतच होणार आहे. आमच्या ग्रंथालयात आम्ही पेनड्राईव्ह ठेवलेला आहे. त्यात, १२०० पुस्तकांच्या स्कॅन केलेल्या प्रती आहेत. त्याचसोबत आमच्या संकेतस्थळावरसुद्धा आम्ही वाचकांना अनेक पुस्तके उपलब्ध करून दिलेली आहेत. ज्यांना ती ऑनलाईन वाचायची नाहीत, ते वाचक त्यांच्या प्रिंट काढून ती वाचू शकतात.
मधुमिलिंद मेहेंदळे, अध्यक्ष, पुणे नगर वाचनमंदिर