कहो जी तुम क्या क्या...

    30-Aug-2024
Total Views |

Child Sexual Abuse 
 
हे आव्हान देताना ही स्त्री ‘वखवखलेल्या नजरेने काय बघतोस गधड्या सांग, काय विकत घेतोस मोहब्बत बेचती हूं मै, शराफत बेचती हूं मै, अदोओं के खजाने, जवानी के तराने, बहारो के जमाने, ये मस्ती के घेरे, ऐ महकें अंधेरे, ये रंगीन डेरे’ अशी सर्व स्त्री खजिन्याची यादीच ठेवते. यातील मथितार्थ असा की, पुरूषाने केवळ स्त्रीचा उपभोग्य वस्तू म्हणून वापर करता कामा नये, हा संदेश शायरास द्यायचा आहे, कारण...
 
 
गेल्या काही काळात महिला अत्याचाराच्या घडलेल्या घटनांनंतर समाजमन ढवळून निघाले आहे. संघटना आणि नागरिकांनी एकत्र येऊन घटनेबद्दल रोष आणि आपल्या लेकी-बाळींच्या सुरक्षिततेबाबत काळजीदेखील व्यक्त केल्याचे ठिकठिकाणी बघायला मिळाले. यासाठी पुन्हा एकदा संस्कार, पाश्चात्यांचे अनुकरण आणि काही क्षेत्रात सर्रास अनिर्बंधित असा स्वैराचाराचा अतिरेक हे मुद्दे आपसूकच ऐरणीवर आले. मात्र, एकदा का घरातून आपली लेक शिक्षणासाठी वा उदरनिर्वाहासाठी बाहेर पडली की, ती सुरक्षित घरी येईपर्यंत जी आप्तांची विशेषतः पालकांची काळजीने घालमेल होत असते ती वाढली आहे. दुर्देव असे की, अशा घटना घडल्या की काही काळ यावर मंथन केले जाते आणि मग जो-तो आपापल्या कशासाठी - पोटासाठी या उक्तीनुसार व्यग्र झालेला असतो, अशी काळजी करायची असते, हे भानदेखील अनेकांना राहात नाही आणि याच स्थितीचा गैरफायदा काही वासनांध घेत असतात. त्यामुळे यासाठी जागरूकता आणि समुपदेशन अतिशय महत्त्वाचे वाटते. सुदैवाने शिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे शहरात याबाबत ३२ शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला, तसेच मध्यंतरी विविध संघटनांनी ‘सब गोविंद बने’ असा संदेश दिला. जवळपास ७५० विद्यार्थिनींनी ‘मुलींची सुरक्षितता आमचे प्राधान्य’ या कार्यक्रमात अन्याय सहन न करण्याची शपथदेखील घेतली. याशिवाय भाजप महिला मोर्चाच्या विनंतीवरून पोलीस आयुक्तांनी तातडीने याच संदर्भात शालेय सुरक्षा परिषददेखील आयोजित केली हे सर्व सकारात्मक घडत आहे. साहिर लुधियान्वी या शायराने लिहिलेले काव्य यानिमित्ताने अधोरेखित करावे वाटते, अशाच पुरूषी वर्चस्वाचा वर्षानुवर्षे सामना कराव्या लागणार्‍या स्त्रीकडून या विकृतीत वावरणार्‍या पुरूषांना अगदी त्वेषाने त्यांनी शायरीतून उत्तर दिले. हे आव्हान देताना ही स्त्री ‘वखवखलेल्या नजरेने काय बघतोस गधड्या सांग, काय विकत घेतोस मोहब्बत बेचती हूं मै, शराफत बेचती हूं मै, अदोओं के खजाने, जवानी के तराने, बहारो के जमाने, ये मस्ती के घेरे, ऐ महकें अंधेरे, ये रंगीन डेरे’ अशी सर्व स्त्री खजिन्याची यादीच ठेवते. यातील मथितार्थ असा की, पुरूषाने केवळ स्त्रीचा उपभोग्य वस्तू म्हणून वापर करता कामा नये, हा संदेश शायरास द्यायचा आहे, कारण...
 
आज क्यू हमसे पर्दा है... 
महाभारत, रामायणापासून स्त्रीबद्दल असलेला पुरूषातील मदमस्तपणा लपून राहिलेला नाही. मात्र, त्याचे दुष्परिणाम जेवढे प्रभाव टाकणारे असायला हवेत, त्यापेक्षा त्यातील वस्त्रहरण आणि अपहरण, याचेच उदात्तीकरण अधिक होत राहिले. दुदैवाने आपल्या भारतातील महिलेला नेमक्या अशाच उदात्तीकरणाचे प्रोत्साहन करण्याच्या वृत्तीला सातत्याने बळी पडावे लागत आहे. ही पुरूषी विकृती रावण आणि कौरव यांच्या त्या काळातील दुष्कृत्यांपेक्षाही भयंकर असल्याने आपल्या देशात काही माध्यमे आणि काही नतद्रष्ट लोक नको तो उपद्व्याप करतात. बदलापूर आणि कोलकात्यातील घटनांनी ते अधिक उजागर झाले. त्यामुळे या देशातील त्या गुन्हेगारांना इतरांनाही कायम धाक राहील, असे मृत्युदंडाचे शासन करणे भाग आहे. मात्र, अशा घटनांचे जे उदात्तीकरण करून स्वतःला अतिबुद्धीमान समजत आहेत, त्या लोकांचा बंदोबस्त करण्याची खरी वेळ आली आहे. एकीकडे मंचावर येऊन जाहीररित्या महिलांच्या संरक्षणाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे महिलांच्या असहाय्यतेचा लाभ उठवित, त्यांचे शोषण करायचे, हे जे नको ते धंदे केले जात आहेत, त्यांना पायबंद घातला गेला, तरच महिलांवरील छुपा अत्याचार बंद होऊ शकेल. यासाठी महिलांनी सक्षम होणे आणि महिलांना सक्षम करणे, हे उपाय योग्य असले तरी महिलांवरील छुप्या अन्यायाची प्रवृत्ती अतिशय घातक आणि गंभीर आहे. स्त्रीच्या उपभोग्य वस्तू म्हणून वापराबाबतचा सूचक संदेश साहिर लुधियान्वी या शायराने दिला आहे. त्याचे कारणच हे होते की, या स्त्रीसाठी हे वखवखलेले पुरूष चक्क एकेक मागणी कशी करतात, याची व या निर्लज्जपणाची जंत्रीच त्यांनी या काव्यात मांडली आहे. ‘तेरा हर रंग हमने देखा हैं, तेरा हर ढंग हमने देखा हैं, तुझको हर तरह आजमाया हैं, पा के खोया हैं, खो के पाया हैं.’ असे असूनही हे पुरूष त्या महिलेला ‘तू अगर मेहरबान हो जाए, ये जमी आसमांन हो जाए’ असा निर्लज्ज आशावाद प्रकट करतात आणि वरून आज ‘क्यू हमसे पर्दा हैं’ असा सवालही करतात. त्यावर त्वेषाने क्षुब्ध झालेली ही स्त्री त्यास ‘कहो जी तुम क्या क्या खरीदोगे’ म्हणून लज्जित करायचा, त्यास पश्चाताप वाटावा असा प्रयास करते. हा मथितार्थ घेत त्यांनी हे काव्य लिहून ठेवले, जे आजदेखील चपखल लागू पडते.
 
लेखक - अतुल तांदळीकर