मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chandrababu Naidu) "राज्यातील मंदिरांमध्ये फक्त हिंदूंनाच काम दिले जाईल. हिंदू मंदिरांमध्ये गैर-हिंदूंना नोकऱ्या देऊ नयेत.", अशी कडक घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केली. त्यांनी मंदिराच्या पुजाऱ्यांच्या पगारातही ५० टक्के वाढ जाहीर केली आहे. यासोबतच 'नाई ब्राह्मणांना' किमान २५ हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल आणि वेदविद्या संपादन करणाऱ्या बेरोजगार तरुणांनाही मासिक ३ हजार रुपये भत्ता दिला जाईल असे सांगण्यात आले आहे.
हे वाचलंत का? : बांगलादेशच्या युनूस सरकारने जमात-ए-इस्लामीवर बंदी उठवली!
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये काम करणाऱ्या १६८३ पुजाऱ्यांचे वेतन १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये प्रति महिना करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, राज्य सरकारने ‘धूप दीप नैवेद्यम योजने’ अंतर्गत छोट्या मंदिरांना देण्यात येणारी आर्थिक मदत ५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेतला आहे. झालेल्या बैठकीत मंदिर ट्रस्टमध्ये आणखी दोन मंडळ सदस्य जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. २० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक महसूल असलेल्या मंदिरांच्या विश्वस्त मंडळात सध्या १५ सदस्य आहेत. आता ही संख्या वाढवून १७ होणार आहे. याशिवाय विश्वस्त मंडळात एक ब्राह्मण आणि एक नाई ब्राह्मण सदस्य असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. एनडीएने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिले होते.
बैठकीदरम्यान चंद्राबाबू नायडू म्हणाले की, आंध्र प्रदेशातील १,११० मंदिरांसाठी विश्वस्त नेमले जात आहेत. सध्या बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या मंदिराच्या ८७ हजार एकर जमिनीवर कायदेशीर मार्गाने पुन्हा दावा केला जाईल. राज्यात सक्तीचे धर्मांतर होता कामा नये. श्रीवाणी ट्रस्ट अंतर्गत प्रत्येक मंदिराला 10 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री नायडू यांनी केली. आवश्यक असल्यास त्या कामांचा आढावा घेऊन आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल. ज्या मंदिरांसाठी १० लाखांपेक्षा जास्त निधीची आवश्यकता आहे अशा मंदिरांसाठी प्रस्ताव पाठवण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
पुढे ते म्हणाले, “आंध्र प्रदेशातील प्रत्येक मंदिरात अध्यात्म फुलले पाहिजे. अध्यात्मिक कार्यक्रम अशा प्रकारे आयोजित केले पाहिजेत की भक्त मंदिरात परत येतील. मंदिरे आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसर अतिशय स्वच्छ ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.” बैठकीदरम्यान त्यांनी वायएस जगन मोहन रेड्डी प्रशासनाच्या काळात हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा तीव्र निषेध केला. त्यांनी अशा गुन्ह्यांना जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आणि आंध्र प्रदेशात सक्तीचे धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही यावर भर दिला.