नवी दिल्ली : अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्याची उभारणी वेगाने सुरू असून कामगारांच्या अभावी काम बंद पडल्याचा काही प्रसारमाध्यमांनी केलेला दावा धादांत खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. देशातील काही निवडक प्रसारमाध्यमांनी गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराविषयी अपप्रचार करणारे वृत्त चालविले होते.
मंदिराच्या उभारणी कार्यात असलेले कामगार तेथून पळून गेले असून त्यामुळे मंदिराची उभारणी ठप्प झाल्याचे सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिराचे बांधकाम ठप्प झाल्याचाही दावा करण्यात आला होता. निवडक प्रसारमाध्यमांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे शनिवारी जारी करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये मंदिराचा पहिला व दुसरा मजला आणि परकोटा अर्थात प्रदक्षिणा मार्गाचे बांधकाम वेगात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.