आषाढातील काळ्याकुट्ट ढगांआडून जेव्हा हलके हलके कोवळे ऊन डोकावते, तेव्हा श्रावणाची चाहूल लागते. हिंदू कालगणनेप्रमाणे येणारा हा पाचवा महिना सृजनाचा महिना म्हणून ओळखला जातो. ही सृजनशीलता फक्त निसर्गापुरतीच मर्यादित नाही, तर ती साहित्यिक आणि मुख्यत्वे कवींमध्येही जागृत होते. श्रावणात निसर्गात जसे नवचैतन्य निर्माण होते, तसेच ते कवींच्या अंतरंगातही निर्माण होते आणि त्यातून आकार घेतात, त्या ‘श्रावणी कविता’. अनेक कवींनी श्रावणाला आपल्या कवितेत शब्दबद्ध केले आहे. बालकवींची श्रावणमासी हर्ष मानसी’ ही कविता असेल किंवा कुसुमाग्रजांची ‘हासरा नाचरा जरासा लाजरा’ ही कविता असेल. आपण दरवर्षी श्रावणात या कवितांची पारायणे वाचतोच. पण, अशा या गाजलेल्या कवितांव्यतिरिक्त अन्य कवींनी रेखाटलेल्या श्रावणाचे रसग्रहण...
श्रावणाचे आगमन होताच, निसर्गात सप्तरंगांची उधळण होते, जणू श्रावण स्वत:च हे रंग आपल्यासोबत घेऊन येतो आणि चहूबाजूंना उधळतो, असे वर्णन कवी सदानंद रेगे यांनी आपल्या ‘आला श्रावण आला’ या कवितेत केले आहे. रेगे म्हणतात,
आला श्रावण श्रावण
गुच्छ रंगांचे घेऊन,
ऊनपावसाचे पक्षी
आणि ओंजळीमधून
श्रावण येताना आपल्यासोबत रंगांचे गुच्छ आणि ओंजळीत ऊनपावसाचे पक्षी घेऊन येतो आणि चहूकडे उधळतो. या उधळणीमुळे दाही दिशा आपली मरगळ झटकून पुन्हा एकदा एखाद्या यौवनात असलेल्या युवतीप्रमाणे भासू लागतात, म्हणून रेगे आपल्या कवितेच्या शेवटी लिहितात-
आला श्रावण श्रावण
ओल्या सोनपावलांनी,
दाही दिशा महिरल्या
यौवनाच्या मंजिर्यांनी
एकीकडे कवी सदानंद रेगे यांना श्रावण स्वत: रंग घेऊन येतो असे वाटते, तर दुसरीकडे कवयित्री इंदिरा संत यांना श्रावण महिना हा एखाद्या मनस्वी चित्रकाराच्या चित्राप्रमाणे वाटतो. त्यांच्या ‘श्रावण’ या कवितेत त्या लिहितात-
बांधले, सोडले हिंदोळे हर्षाचे
हासले, रूसले मयूर मनाचे
श्रावणा, कुणाचे मनस्वी हे क्षण?
निसर्गचित्रांत पावले स्पंदन
श्रावण महिना हाच मुळी हर्षाचा, उल्हासाचा महिना. या महिन्यात साजरे होणारे सणउत्सव मानवी आयुष्यात आनंदाची पेरणी करत असतात. श्रावण महिना निसर्गासाठी आणि माणसांसाठी एक सोहळा बनून येतो. एखाद्या मनस्वी चित्रकाराने निरनिराळ्या रंगांची उधळण करून एखादे सुंदर चित्र काढावे आणि पाहणार्याने ते चित्र भान हरखून पाहतच राहावे, असे काहीसे वातावरण या महिन्यात असते आणि ते इंदिरा संतांनी आपल्या कवितेतून अचूक मांडले आहे.
श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना. कवी बा. भ. बोरकरांना फक्त तो कालनिर्णयानुसार पाचवा महिना वाटत नाही, तर एका गर्भवती स्त्रीला जसा पाचवा महिना लागतो, तसाच तो पृथ्वीला लागला आहे, असे काव्यात्मक वर्णन त्यांनी आपल्या ‘समुद्र बिलोरी ऐना’ या कवितेत केले आहे. कवी म्हणतो,
समुद्र बिलोरी ऐना
सृष्टीला पाचवा महिना
वाकले माडांचे माथे
चांदणे पाण्यात न्हाते
आकाशदिवे लावित आली कार्तिक नवमीची रैना
पाचव्या महिन्यात गर्भवतीच्या शरीरात आणि रूपात जसे बदल होतात, तसे बदल या पाचव्या म्हणजेच श्रावण महिन्यात सृष्टीमध्येसुद्धा होतात. ती सुद्धा एखाद्या गर्भवतीसारखी ओटी-पोटी बहरते आणि अधिक सुंदर दिसू लागते, असे बोरकर म्हणतात. ‘समुद्र बिलोरी ऐना’ या कवितेत बोरकरांनी श्रावणात सृष्टी कशी दिसते, याचे वर्णन केले आहे, तर ‘झाले हवेचेंच दही’ या कवितेत बोरकरांनी श्रावणाल्या वरुणराजाचे वर्णन केले आहे.
आला गं श्रावण आला गं श्रावण। सृष्टीचा लावण्यराज
मोतिया वृष्टीला घेऊन सोबत। लेवून सुवर्णसाज
श्रावण हा सृष्टीचा लावण्यराज. श्रावणातील पाऊस हा जणू मोत्यांचा पाऊस अन् तो सृष्टीवर मोत्यांची मनसोक्त उधळण करतो. पण, जर एखादी स्त्री नटूनथटून आपल्या जोडीदाराला भेटायला जात असेल, तर तिला या पावसाच्या सरी मोत्यांसारख्या वाटणार नाहीत, याचे वर्णन करताना बोरकर पुढे लिहितात-
धटिंगण पावसाने बाई उच्छाद मांडिला
माझा फुलांचा शृंगार ओली चिखली सांडला
त्या तरुणीचा शृंगार जेव्हा या श्रावणसरींमुळे विस्कटतो, तेव्हा ती त्यांच्यावर चिडते. अशा निरनिराळ्या दृष्टिकोनातून बोरकरांनी त्यांच्या कवितेत श्रावण चितारला आहे.
अनेक कवींनी श्रावण आपल्याला नेमका कसा भासतो, याविषयी काव्यसुमने गुंफली आहेत. पण, कवी मंगेश पाडगावकर एखाद्या आकंठ प्रेमात बुडालेल्या युवतीला श्रावण कसा भासतो, याचे चित्रण आपल्या कवितेमध्ये करतात. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टी आपल्या प्रियकराची, प्रेयसीची आठवण करून देतात, तशीच आठवण पाडगावकरांच्या कवितेतील युवतीलाही होते. ती म्हणते,
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा
उलगडला झाडांतून
अवचित हिरवा मोरपिसारा
जगून ज्याची वाट पाहिली तर सुख आले दारी
जिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझे उदारा
श्रावण महिना हा जणू या युवतीला तिच्या प्रियकरासोबत भेट घडविण्यासाठीच आला आहे, असे वाटते. श्रावणतल्या पावसात निसर्ग मोर होऊन नाचतोय आणि या मोरावरून तिला राधा-कृष्ण आठवतात. त्यांची जशी भेट झाली तशीच आपलीही आपल्या प्रियकराशी भेट होणार, ही सुवार्ता सांगण्यासाठीच जणू श्रावणाचे आगमन झाले आहे, असे तिला मनोमन वाटते आणि ती सुखावून जाते.
कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या ‘श्रावणसरी’ कवितेत श्रावण महिन्यात सृष्टीची भावनिक अवस्था कशी होते, याचे वर्णन केले आहे. शांताबाई म्हणतात-
कशी मनातून मने गुंतता
भाव दाटती उरी
उन्हात न्हाऊन सुंदर होऊन
येती श्रावणसरी
जलथेंबांनी कशी चमकते
सृष्टि ही साजरी
कधी हसर्या, कधी लाजर्या
आल्या श्रावणसरी
श्रावणात ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. आषाढ महिन्यातील पावसाप्रमाणे श्रावणी पाऊस हा झोडपणारा नसतो. तो काहीसा आल्हाददायक असतो. त्यामुळे अवघी सृष्टी आनंदून जाते आणि ती अधिक सतेज दिसू लागते. श्रावणात सृष्टीला तर नवचैतन्य प्राप्त होते, पण आपल्या साजणाच्या प्रतीक्षेतील युवतीला श्रावण आल्यावर साजण आला नाही, याची खंत अधिकाधिक छळू लागते आणि ती निराश होते, असे वर्णन शांताबाई ‘रिमझिम बरसत आला श्रावण’ या कवितेत करतात.
रिमझिम बरसत श्रावण आला
साजण नाही आलं
थरथरते मी, मी बावरते
हृदय रिते हे करी सावरत
सांगा कुणी सजणाला
एकीकडे श्रावण आला म्हणून आनंदून गेलेली सृष्टी आणि दुसरीकडे साजण नाही आला म्हणून निराश झालेली युवती, असा विरोधाभास शांताबाईंच्या कवितांमध्ये पाहायला मिळतो.
नव्या पिढीतील प्रसिद्ध कवी आणि गीतकार यांना तर श्रावण हा एक कवी वाटतो. या श्रावणकवीचे वर्णन करताना गुरु ठाकूर लिहितात-
हिरवी छंदे हिरवी यमके
निवडून हिरवे वृत्त नेमके
हिरव्याकंच कविता आता
झरतील ठाई ठाई
श्रावण बसला लेखणी मध्ये
भरून हिरवी शाई
एका कवीच्या मनाची श्रावणात काय अवस्था होते, हे गुरु ठाकूर यांनी त्यांच्या या कवितेत अचूक मांडले आहे. श्रावण आला की कवींना कविता लिहिण्याचे स्फुरण चढते, जणू श्रावण स्वत: त्यांना या कविता लिहायला प्रवृत्त करतो. श्रावण हा महिना वर्षातून एकदाच येतो. पण, आपले संपूर्ण आयुष्य हे श्रावणासारखेच. श्रावणात जसा ऊन-सावलीचा खेळ चालू असतो, तसा आपल्या आयुष्यात सुख:दुखाचा खेळ सुरू असतो. म्हणूनच गुरु ठाकूर यांनी ‘आयुष्याला श्रावण म्हणतो’ या कवितेत ‘आयुष्य म्हणजे श्रावणच’ असे म्हटले आहे.
सुख वेचिन म्हणण्याआधी
घन दुःखाचा गहिवरतो
अन दु:ख सावरू जाता
कवडसा सुखाचा येतो
या ऊनसावली संगे
रमण्यात ही मौज म्हणूनी
मी हसून हल्ली माझ्या
जगण्याला श्रावण म्हणतो
असा हा श्रावण वेगवेगळ्या रूपात कवींना भेटतो. गवसतो. असा हा श्रावण हा महिना सगळ्यांच्या दृष्टीने तसा महत्त्वाचा. शेताची कामे कमी होतात म्हणून शेतकर्यांसाठी, सणांच्या सुट्ट्या मिळतात म्हणून विद्यार्थ्यांसाठी, माहेरी जायला मिळते म्हणून माहेरवाशिणींसाठी आणि लेखणीलाही पालवी फुटते, म्हणून कवींसाठी! श्रावण महिन्याला असलेली भावनिक किनार दुसर्या कोणत्याच महिन्याला नाही. त्यामुळे श्रावण हा महिना जितका सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा, तितकाच साहित्यिकदृष्ट्याही तो संपन्न. अशा या महिन्यात कवींना कविता सुचल्या नाहीत तर ते नवलचं!
दिपाली कानसे