यंदा विक्रमी आयटीआर फाईलिंग, तब्बल ७.२८ कोटी विवरणपत्रे दाखल!
03 Aug 2024 14:49:32
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विक्रमी प्राप्तिकर विवरणपत्रे(आयटीआर) दाखल झाली आहेत. दि. ३१ जुलै २०२४ पर्यंत विक्रमी ७.२८ कोटी विवरणपत्रे दाखल झाली असून यंदा मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मागील आर्थिक वर्षात हीच संख्या ६.७७ कोटी इतकी नोंदविण्यात आली होती. यंदा दाखल केलेल्या विवरणपत्रांपेक्षा ही संख्या ७.५ टक्क्याहून अधिक आहे.
दरम्यान, करदात्यांनी वेळेत अनुपालन केल्यामुळे यावर्षी करदात्यांनी मोठ्या संख्येने नवीन कर प्रणालीची निवड केली असून वर्ष २०२४-२५ साठी दाखल एकूण ७.२८ कोटी विवरणपत्रांपैकी ५.२७ आयटीआर नवीन कर प्रणालीमध्ये दाखल करण्यात आली आहेत. तसेच, जुन्या कर प्रणालीमध्ये २.०१ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे, सुमारे ७२ टक्के करदात्यांनी नवीन कर प्रणालीची निवड केली तर दुसरीकडे २८ टक्के करदाते जुन्या कर प्रणालीमध्ये करभरणा करत आहेत.
प्राप्तिकर विभागाकडून आवाहन जारी
करदात्यांनी आयटीआर व अर्ज भरण्याची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल विभागाने आभार मानले आहेत. आयटीआर भरल्यावर पडताळणी करणे राहिले असल्यास आयटीआर भरल्यापासून ३० दिवसांच्या आत त्यांची पडताळणी करण्याचे आवाहन विभागाने करदात्यांना केले आहे. कोणत्याही कारणास्तव आयटीआर भरण्याची प्रक्रिया राहिली असेल तर त्वरित भरण्याचे कळकळीचे आवाहन विभागाने करदात्यांना केले आहे.