मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवार, दि. ३ ऑगस्ट रोजी भेट घेतली. यावेळी वरळी येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या शिष्टमंडळाने विकासक थकीत भाडे देत नाही , ताबा देत नाही, स्थगिती असूनही कामे सुरु आहेत, वीजेचा पुरवठा नाही, लिफ्ट्स दिलेल्या नाहीत. जुन्या इमारतींची अवस्था वाईट होत असून दुरुस्ती केल्या जात नाही अशा तक्रारी केल्या जात असल्याचे राज ठाकरेनी निदर्शनास आणून दिले.
याच वेळी गोमाता जनता एसआरए, श्रमिक एकता फेडरेशन, साईबाबा नगर, भांडूप पूर्व येथील साईनगर एसआरए याठिकाणच्या रहिवाशांनी आपल्या व्यव्था मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. यावर मुख्यमंत्र्यांनी नियम झुगारून देणाऱ्या अशा विकासकांवर कडक कार्यवाही करण्याचे तसेच एसआरए इमारतीतील ज्या सदनिका विक्रीसाठी खुल्या आहेत.
त्यांची विक्री थांबविण्याच्या नोटीसा देण्याचे निर्देशही त्यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांना दिले. इमारतींमध्ये आवश्यक त्या सुविधा आहेत का तसेच किती ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे ते तातडीने प्रत्यक्ष फिल्डवर अधिकाऱ्यांना पाठवून तपासण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
बीडीडी चाळीतील दुकानदारांना दिलासा
बीडीडी चाळींचे पुनर्वसन सुरु असून पूर्वीपासून त्याठिकाणी असलेल्या दुकानदारांनी आपल्याला पुनर्विकसित ठिकाणी वाढीव जागा मिळावी अशी मागणी केली. यासंदर्भात दुकानदार न्यायालयात देखील गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या दुकानदारांना वाढीव जागा कशी देता येईल याबाबत नव्या इमारतींच्या आराखड्याचा विचार करून तसा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये वरिष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या असेही त्यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांना सांगितले.