सुधीर मुनगंटीवार : पुतळ्यांसंदर्भात धोरण निर्मितीची गरज
29-Aug-2024
Total Views |
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणारा राहुल गांधींचा निकटवर्तीय आहे, असे वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. तसेच पुतळ्यांसंदर्भात धोरण निर्मितीची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही निश्चितपणे दु:खदायक आणि चिंताजनक घटना आहे. परंतू, या घटनेचं राजकारण करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी चौकशीची मागणी केली. या चौकशी समितीत आमच्यापैकी काही सदस्य असावेत, असं विरोधी पक्षांना वाटलं तर त्यांना तशी मागणी करता येईल. पण फक्त आणि फक्त सत्तेसाठी या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं योग्य नाही."
काँग्रेसकडून मुर्तीकार हा आरएसएसचा माणूस असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर मुनगंटीवार म्हणाले की, "पुतळा तयार करणारा हा राहुल गांधींचा माणूस आहे असं मला कळलं. त्यामुळे ही माहिती तपासावी लागेल. चौकशीमध्ये काय करावं यावर जास्त भर द्यायला हवं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपण राजकारणाचा विषय बनवण्याचा प्रयत्न केला तर हे दुर्दैव आहे. हे शिवभक्तांना मान्य नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "काही विषय हे राज्यात धोरण करून त्याची अंमलबजावणी करण्याचे विषय आहे. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनंतर महाविकास आघाडीला काय करावं हे सुचत नव्हतं. त्यामुळे आता ते या विषयाचं राजकारण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विषयात विरोधी पक्षाने एकही सूचना केली नाही. चौकशीचा अँगल कसा असावा, त्याची चौकट कशी असावी, चौकशीसाठी कोणत्या लोकांची नियूक्ती करावी, यावर ते कुणीच बोलत नाहीत. यातून काय निष्पन्न होतं? छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी संवेदनशील विषय नाही का?" असा सवाल त्यांनी केला.
"यासंदर्भात एक परिपूर्ण बांधकामाचं धोरण करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटतं. मुर्तीला मंजूरी देण्याचं धोरण हे या सरकारने केलेलं नाही. ते मागच्या सरकारमध्ये केलेलं आहे. या धोरणातील उणीवा सर्वांनी दूर करायला हवं. यावर राजकारण करणं अतिशय वाईट आहे," असेही ते म्हणाले.