काँग्रेसचा महिलाविरोधी चेहरा पुन्हा उघड! 'लाडकी बहीण' विरोधात कार्यकर्त्याची याचिका
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात
29-Aug-2024
Total Views |
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्याने याचिका केली असून काँग्रेसचा महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे, असा घणाघात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी केला आहे. लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबूजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे, असेही ते म्हणाले.
केशव उपाध्ये म्हणाले की, "लाडकी बहिण योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्यामार्फत कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी लाडकी बहिण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे. या याचिकेमुळे कॉंग्रेसने आपला महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे."
"वडपल्लीवार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने यापूर्वीही लाडकी बहिण योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे. महायुती सरकारच्या या योजनेचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. या योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजून झुकेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस या ना त्या प्रकारे योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "राज्यातील माताभगीनी आणि मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण आणि सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही हे महायुती सरकारकडून वारंवार स्पष्ट करण्यात येत असूनही कॉंग्रेसकडून अपप्रचार केला जात आहे. विरोधाला विरोध करायचा या भूमिकेनुसार महिला हिताच्या या योजनेत आडकाठी करण्यात येत असून कॉंग्रेस आणि विरोधकांच्या भुलथापांना सूज्ञ जनता बळी पडणार नाही," असेही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.