गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २८ जणांचा मृत्यू , प्रशासन अलर्ट मोडवर
29-Aug-2024
Total Views |
गांधीनगर : गुजरात राज्यात पावसाने हाहाकार माजला आहे. या अतिवृष्टीमुळे एकूण २८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील १८ जिल्हे हे जलमय झाले असून राज्याला मोठा हदरा बसला आहे. कच्छ, द्वारका, जामनगर, राजकोट ते वडोदरा पाण्यामध्ये बुडाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गुजरात येथील वडेदऱ्यातील विश्वामित्री नदीला पूर आल्याने रस्त्यांना जलमय स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील सखल भागात पाणी साचले आहे. गुजरात येथील दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात बुडाली आहेत. यावेळी लष्कर मतद कार्य करत आहेत. कच्छ, द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, जुनागड, राजकोट, बोताड, गीर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
येत्या ५ दिवसात अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसामुळे गुजरात येथील रस्ते मार्ग आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली गेली आहेत. यामुळे गुजरात राज्यातील निम्मी दळणवळण सुविधा ठप्प पडली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत रेल्वे बंद करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. २९ ऑगस्ट रोजी हवामान खात्याने गुजरात येथील अकरा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याचे सांगितले.
वडोदरा शहर पाण्याखाली गेल्याने काही नागरिक पाण्यात अडकली आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. तसेच रेस्क्यूच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. ५ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. लष्कर, प्रशासन, भारतीय हवाईदल बचाव कार्य अलर्ट मोडवर आहे. याप्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील आलेल्या पुराचा आढावा घेत गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र यादव यांच्याशी चर्चा केली आहे.