सिंधुदुर्ग : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणीसध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका करण्यात येत आहे. मात्र, आता पुतळ्याचं सुशोभिकरण करण्याचं काम उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडूनच करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारी, महाविकास आघाडीकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी दौराही करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि खासदार नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये जोरदार राडाही झाला.
मात्र, उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभिकरण करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. उद्धव ठाकरेंचे समर्थक बाबा सावंत आणि बाबा आंगणे यांनी महाराजांच्या पुतळ्याचं बांधकाम करण्याचं कंत्राट घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करणाऱ्यांकडूनच पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात आल्याची टीका विरोधकांवर करण्यात येत आहे.