देशातील काही करंट्या लोकांनी आता आपल्या धर्मांधतेसाठी रेल्वेला लक्ष्य केले आहे. गेल्या काही महिन्यांत झालेले रेल्वे अपघात हे निव्वळ अपघात नसून, तो घातपाताचा प्रकार आहे, असे उघड होत आहे. दिवंगत सेनाप्रमुख जन. बिपीन रावत यांनी व्यक्त केलेल्या देशांतर्गत ‘अर्ध्या आघाडी’ने आपले कार्य सुरू केल्याचे हे धोकादायक लक्षणच!
गतवर्षी जूनमध्ये ओडिशातील बालासोर येथे ‘कोरोमंडल एक्सप्रेस’ला झालेला अपघात हा घातपाताचा प्रकार असावा, अशी शक्यता या अपघाताच्या चौकशी समितीने व्यक्त केली आहे. त्यानंतर गेल्या वर्षभरात देशात अचानक रेल्वे अपघातांच्या संख्येत झालेली वाढ ही चिंताजनक असली, तरी ती तितकीच बुचकळ्यात टाकणारी आहे. भारतीय रेल्वेने गेल्या दहा वर्षांत आपल्या मार्गांचा विस्तारच केला असे नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ही रेल्वे अधिक सुरक्षितही केली होती. तरी गेल्या वर्षभरात अचानक रेल्वेगाड्या रुळांवरून घसरू लागल्या आणि सिग्नल यंत्रणेतील दोषांमुळे रेल्वेगाड्यांचे अपघातही झाले. त्यात अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी गेला. रेल्वेच्या सुविधांचे आणि यंत्रणेचे नुकसान झाले, ते वेगळेच. रेल्वेमार्गांवर अचानक अपघात कसे होऊ लागले, हा चिंतनापेक्षा चिंतेचा विषय. यामागे देशांतर्गत हितशत्रूंचे सुसंगत कारस्थान तर नाही ना, असा संशय निर्माण झाला आहे. पाकिस्तानातील एक कट्टरपंथीय दहशतवादी फरहतुल्ला घोरी याच्या विधानामुळे या संशयाला बळकटी प्राप्त झाली आहे.
या फरहतुल्ला घोरीने ‘टेलिग्राम’ या अॅपवर प्रसृत केलेल्या आपल्या एका व्हिडिओ संदेशात भारतीय रेल्वेला घातपाताचे लक्ष्य करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, दिल्ली आणि देशाच्या आणखी काही भागांमध्ये आपल्या समर्थकांनी रेल्वेगाड्या रुळांवरून कशा घसरतील, यासाठी प्रयत्न करण्याचीही त्याची भाषा. तसेच भारतातील विविध वस्तूंच्या पुरवठ्याच्या जाळ्यांमध्येही व्यत्यय आणण्याचेही त्याचे मनसुबे उघड झाले आहेत. भारतातील पेट्रोल व अन्य इंधनांच्या पाईपलाईन्स, रेल्वेसेवा तसेच वस्तूंचे पुरवठादार यांच्या कार्यात अडथळा आणून देशात गोंधळ माजविण्याचे मोठे षड्यंत्रही यानिमित्ताने समोर आले आहे. त्याचप्रमाणे भारतातील प्रमुख हिंदू नेत्यांवर आणि पोलिसांवर हल्ले करण्याचे, प्रसंगी आत्मघाती हल्ले करण्यासाठीही घोरीने माथी भडकावण्याचे उद्योग केले आहेत.
घोरीने केलेल्या रेल्वेगाड्यांच्या डिरेलमेंटच्या उल्लेखाने भारतातील सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. म्हणूनच त्यांनी गेल्या काही महिन्यांतील रेल्वे अपघातांच्या कारणांची फेरचौकशी सुरू केली असून हे अपघात होते की घातपात, याचा तपास सुरू केला आहे. या सुरक्षा यंत्रणांना दि. २३ ऑगस्ट व दि. २४ ऑगस्ट रोजी काही ‘वंदे भारत’ रेल्वमार्गावर सिमेंटचे ठोकळे ठेवलेले आढळून आले होते. (‘सरफरोश’ चित्रपटातील एका संवादाची येथे तीव्रतेने आठवण येते. त्या प्रसंगात जप्त केलेला शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा पाहताना एक पोलीस अधिकारी आपल्या वरिष्ठांना सांगतो की, “भारताचे शत्रू नशीबवान आहेत, कारण त्यांना भारताविरोधात लढण्यासाठी सैनिक पाठवावे लागत नाहीत, ते फक्त शस्त्रास्त्रे पाठवितात. त्यांचे सैनिक येथेच आहेत.”)
भारतातील हैदराबादचा रहिवासी असलेला घोरी सध्या पाकिस्तानात दडून बसला आहे. पाकिस्तान सरकारने जरी त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले असले, तरी त्याला ‘आयएसआय’ने संरक्षण दिल्याचे मानले जाते. घोरी ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेसाठी दहशतवाद्यांना भरती करण्यात गुंतलेला आहे. आता त्याचा हा व्हिडिओ अचानक प्रसिद्ध होणे, हा भारतात अंतर्गत अराजक निर्माण करण्याच्या ‘आयएसआय’च्या प्रयत्नांचा भाग असल्याचे मानले जाते. या संस्थेने घोरीला यंदा मार्च महिन्यापासून प्रसिद्धीच्या झोतात आणले असून आपल्या अनेक व्हिडिओंमध्ये तो भारताविरुद्ध युद्ध छेडण्याचे आवाहन करताना दिसतो.
भारतात रेल्वेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोट्यवधी लोक रेल्वेसेवेवर अवलंबून आहेत. त्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यास अनेक अडचणी उभ्या राहतात आणि प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच देशातील रेल्वेमार्ग अधिक सुरक्षित आणि भक्कम केले जात असून, रेल्वेगाड्यांची वेगमर्यादादेखील वाढविली जात आहे. लवकरच देशात पहिली बुलेट ट्रेनही धावू लागेल. अशा वेगवान गाड्यांच्या मार्गांवर कोणी घातपाती कृत्य केल्यास त्यात किती निरपराध प्रवाशांचा बळी जाईल, याची कल्पनाही अंगाचा थरकाप उडविणारी आहे. हजारो किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या प्रत्येक भागावर देखरेख करणे अशक्य आहे. त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. भारतात लोकल गाड्यांवर गंमत म्हणून दगड फेकणारे लोक अनेक आहेत. मुंबईकरांना त्यांचा दाहक अनुभव नेहमी येतो. पण, आता यामागेही काही सुनियोजित कटकारस्थान आहे का, असा संशय उद्भवू लागला आहे. ‘सीएए’विरोधी आंदोलनात शरजील इमाम या आंदोलक नेत्याने प. बंगालमधील ‘चिकन नेक’ हा अरुंद प्रदेश भारतापासून तोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावरून भारताच्या अंतर्गत हितशत्रूंची तयारी किती आहे, त्याची कल्पना येते.
भारताच्या तिन्ही सेनादलांचे पहिले संयुक्त प्रमुख दिवंगत जन. बिपीन रावत यांनी देशापुढे चीन व पाकिस्तानइतकाच देशांतर्गत शत्रूंकडून धोका असल्याचे प्रतिपादन केले होते. चीन व पाकिस्तान हे शेजारी देश भारताचे शत्रू असून ते भारतावर एकाच वेळी हल्ला करू शकतात. या दोन आघाड्यांवर एकाच वेळी कसे लढायचे, याची रणनीती लष्कराकडे तयार आहे. पण जन. रावत यांनी यावेळी देशांतर्गत असलेल्या ‘तिसर्या आघाडी’चा धोकाही वर्तविला होता. या आघाडीला त्यांनी ‘अर्धी आघाडी’ म्हटले होते. त्यांच्या प्रतिपादनाचा अर्थ असा की, देशात असलेल्या कट्टरपंथीय मुस्लीम समाजविघातक घटकांकडून अशा युद्धप्रसंगी अंतर्गत अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. या आघाडीशी कसे लढायचे, हा खरा प्रश्न आहे. या देशद्रोह्यांनी अशावेळी रेल्वेमार्गांमध्ये अडथळे निर्माण केल्यास लष्कराला आपले सैन्य व रसद पोहोचविण्यात अडचण येऊ शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या रेल्वेच्या अपघातांचे स्वरूप पाहिल्यास या ‘अर्ध्या आघाडी’ने आपले कार्य सुरू केले आहे का, असा संशय येण्यास वाव आहे.
संजीव ओक