म्हाडाच्या मुंबई सोडतीतील ३७० घरांच्या किमती केल्या कमी ; गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती

मुंबई सोडतीतील ३७० घरांच्या किमती केल्या कमी ; गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती

    28-Aug-2024
Total Views |

mhada




 मुंबई, दि.२८ :  
म्हाडाच्या मुंबई मंडळ सोडतीतील ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीसाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

म्हाडा मुख्यालयातील भारतरत्न गुलझारीलाल नंदा सभागृहात 'म्हाडा शुभंकर चिन्हाचा' अनावरण सोहळा बुधवार, दि.२८ रोजी संपन्न झाला. म्हाडाने आधुनिक काळाची आव्हाने पेलत वेळोवेळी आपल्या कार्यप्रणालीला अद्ययावत केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद सुलभ व पारदर्शक राहावा या उद्देशाने म्हाडातर्फे 'शुभंकर चिन्ह' (Mascot) तयार करण्यात आले आहे. या चिन्हाचे अनावरण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

गृहनिर्माण मंत्री सावे यांनी माहिती दिली की, म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकृती प्रक्रियेला दि.१९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २० टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १५ टक्क्यांनी, उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात येत आहे. म्हाडाने बदलत्या काळाशी जुळवून घेत आपल्या कार्यात नेहमीच बदल केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत लोकाभिमुख सेवा ऑनलाइन करत नागरिकांच्या अनेक अडचणी सोडविल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एक पाऊल पुढे टाकत म्हाडाचे नवे शुभंकर चिन्ह निर्माण करण्यात आले आहे. म्हाडाच्या कार्यप्रणालीची ओळख व मार्गदर्शन मिळविण्याकरिता नागरिकांना याची मदत होणार आहे. लोकांशी अधिक जवळीक साधण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर,उपसचिव गृहनिर्माण विभाग अजित कवडे, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल अंकलगी आदी उपस्थित होते.

या घरांच्या किमती होणार कमी

विकास नियंत्रण नियमावली ३३(५)/३३ (७) व ५८ अंतर्गत येणाऱ्या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, संबंधित जाहिरातीतील योजना क्रमांक २० ते योजना क्रमांक ९९मधील घरांचा यात समावेश आहे. या निर्णयामुळे या योजनेतील घरांच्या किमती १० ते २० लाखांनी कमी होतील असा अंदाज आहे.

उत्पन्न गट               पूर्वीची किंमत                  कमी झालेली रक्कम       टक्केवारी


अत्यल्प उत्पन्न       ३८ लाख ते ४२ लाख             ९ लाख ते १० लाख       २५ टक्के

अल्प उत्पन्न         ४३ लाख ते १ कोटी ७५ लाख    ८ लाख ते ३५ लाख       २० टक्के

मध्यम उत्पन्न       २ कोटी ते ३ कोटी                   ३० लाख ते ४५ लाख      १५ टक्के

उच्च उत्पन्न          ४ कोटी ते ७ कोटी                  ४० लाख ते ७० लाख        १० टक्के

(जाहिरातीतील अंदाजे किमतींनुसार)