"प्रत्येक गोष्टीला निवडणूकीच्या..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका

    28-Aug-2024
Total Views |
 
Fadanvis
 
नागपूर : प्रत्येक गोष्टीला निवडणूकीच्या चष्म्यातून पाहणं चुकीचं आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यामुळे मविआने बुधवारी निषेध आंदोलन केले. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेवर कुणीही राजकारण करू नये. ही घटना निश्चितपणे आपल्या सर्वांकरिता कमीपणा आणणारी आणि अतिशय दु:खद घटना आहे. अशा प्रकारची घटना घडल्यानंतर त्याची योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तसेच तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे. या तिन्ही गोष्टींबाबत कारवाई सुरु आहे. नेव्हीने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असून त्यांनी चौकशी समिती तयार केली आहे. ही समिती तिथे येऊन गेली आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून नेव्ही उचित कारवाई करेल."
 
हे वाचलंत का? -  "शिवसेनेच्या जन्मापासूनच ठाकरेंनी..."; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
 
"तसेच मुख्यमंत्र्यांनी नेव्हीला मदत करून आपण भव्य छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर जे करणं आवश्यक आहे ते केलं जातंय. मात्र, त्याचवेळी विरोधकांनी याचं केवळ राजकारण करणं सुरु केलं आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं आणि प्रत्येक गोष्टीला निवडणूकीच्या चष्म्यातून पाहायचं, हे चुकीचं आहे. एवढं खालचं राजकारण त्यांनी करू नये. राज्य सरकार आणि नेव्हीने एकत्र येऊन अशा चुका पुन्हा घडू नये, ज्यांनी चुका केल्या त्यांना शासन होईल आणि पुन्हा भव्य पुतळा उभा राहिल, याबाबतची कारवाई सुरु केली आहे. या विषयाचं राजकारण महाराष्ट्राला शोभत नाही," असेही ते म्हणाले.