मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या प्रत्येक संबंधितावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. तसेच त्यांनी या घटनेबद्दल जाहीर माफीसुद्धा मागितली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "गेल्यावर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. महाराजांचा तो पुतळा कोसळल्याची घटना महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींप्रमाणे माझ्यासाठी देखील अतिशय क्लेशदायक आहे. मी शासनाचा भाग म्हणून जाहीर माफी मागतो."
हे वाचलंत का? - पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट! यूपीएससीने केलेले आरोप फेटाळले
"महाराजांचा पुतळा उभारताना तेथील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान यासारख्या महत्वाच्या बाबींचा वैज्ञानिक अभ्यास केला होता का? पुतळा बनवण्याच्या सामग्रीची गुणवत्ता याचा शोध घेत संबंधित जबाबदार लोकांची राज्य सरकारने तातडीने चौकशी करत गुन्हे देखील दाखल केले आहेत. लवकरात लवकर राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना केली जाईल पण अशा प्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या प्रत्येक संबंधितावर कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.