उत्तर प्रदेशात चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; पोलीस चकमकीत आरोपीला अटक

    27-Aug-2024
Total Views |
uttar-pradesh-child-girl-raped-in-ayodhya


नवी दिल्ली :           उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील महाराजगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभिया गावात दलित समाजातील एका चार वर्षीय निष्पाप मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी बलात्काराच्या आरोपीला अटक केली असून ३५ वर्षीय सलमान असे त्याचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी सलमान घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांकडून पकडला गेलेला आहे.

दरम्यान, घटनेतील पीडिता मुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ४ वर्षाची निष्पाप मुलगी घराबाहेर खेळत असताना ३५ वर्षाच्या नराधमाने तिला खोलीत बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधमाला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या चकमकीत पायावर गोळी झाडण्यात आली आहे.

बलात्कार घटनेच्या प्रकरणी सीओ सदर संदीप सिंह यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सलमानला शोधण्यासाठी अनेक टीम तैनात केल्या. त्यानंतर त्याला पकडण्यात आले असून आरोपी सलमान हा बिकापूर भागातील रहिवासी आहे. महाराजगंजच्या रुबिनासोबत चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या गैर वर्तनामुळे त्याचे घरच्यांसोबत जमत नव्हते त्यानंतर तो पत्नीसह सासरच्यांसोबत राहू लागला होता.