मुंबई, दि.२७: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरन यादव यांच्या संकल्पनेतून कलेचा प्रचार आणि संवर्धन करण्याच्या हेतूने मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वारसा इमारतीत दोन नव्या शिल्पांचे अनावरण केले. ही दोन्ही शिल्पे श्रीगणेश आणि हनुमानाची आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक वारसा इमारतीस अनेक नागरिक भेट देत असतात. अशावेळी कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या कला स्पर्धेची विजेती भारतीय कलाकार सोनाली अय्यंगार यांनी तयार केलेले श्रीगणेश आणि भगवान हनुमान यांच्या शिल्पांचे महाव्यवस्थापकांनी अनावरण केले.
यावेळी ही शिल्पे साकारणाऱ्या सोनाली अयंगार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना यादव म्हणाले, “हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे. मध्य रेल्वे भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी अशाच प्रकल्पांसाठी आणखी संभाव्य ठिकाणे शोधणार आहे. आम्हाला आशा आहे की याउपक्रमाद्वारे, भारतीय कलाकारांना देशातील इतर ऐतिहासिक आणि प्रसिद्ध वास्तूंमध्ये त्यांचे कार्य देश विदेशातील लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी अशाच संधी उपलब्ध करून दिल्या जातील. सोनाली अय्यंगार यांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (युनेस्को) जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांना या कलेद्वारे योगदान देता आले. ही शिल्पे आता या इमारतींचा वारसा जपत असून इमारतीच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.