पंतप्रधान मोदी करणार भाजप सदस्यत्व मोहिमेचा शुभारंभ

    27-Aug-2024
Total Views |
pm narendra modi bjp membership inaugurate

 
नवी दिल्ली :        भाजपला सर्वव्यापी आणि सर्वसमावेशी बनविणे आणि भाजपच्या राष्ट्र उभारणीची भावना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सदस्यत्व मोहिमेचा शुभारंभ करतील, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली आहे. प्राथमिक सदस्य बनवण्यासाठी सदस्यत्व मोहिमेचा पहिला टप्पा 2 ते 25 सप्टेंबर आणि दुसरा टप्पा 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.


सदस्यत्वाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. या योजनेंतर्गत सदस्यत्व अभियानासाठी 17 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा, 19 ते 21 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा, 22 ते 24 ऑगस्ट या कालावधीत जिल्हास्तरीय कार्यशाळा व पक्षाच्या सर्व मोर्चांतर्फे मोर्चा कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेत 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरावर विभागीय कार्यशाळा आणि संयुक्त आघाडी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले.

सदस्यत्व मोहिमेसाठी 31 ऑगस्ट रोजी सर्व बूथवर एकाच वेळी बूथ कमिटी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. 24 ते 30 ऑगस्ट दरम्यान भाजपच्या सर्व आघाडीच्या राज्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदस्यत्व मोहिमेच्या यशस्वितेसाठी 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील आढावा बैठक आणि सक्रिय सदस्यत्व योजना बैठक आणि 22 ते 23 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय आढावा बैठक होणार आहे. सदस्यत्व मोहिमेच्या अंतिम टप्प्यात 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत प्राथमिक आणि सक्रिय सदस्य नोंदणी तयार केली जाईल, असेही तावडे यांनी नमूद केले आहे.


अशी होणार सदस्यत्व नोंदणी

88 00 00 2024 क्रमांक मिस्ड कॉल, व्हॉट्सॲप चॅटबॉट, पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ, क्यूआर कोड आणि नमो ॲपद्वारे नागरिक लोक भाजपचे सदस्यत्व घेऊ शकतात. भाजप सदस्यत्व अभियान राबविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर 9 सदस्यीय समिती, राज्य स्तरावर 4 किंवा 6 सदस्यांची समिती, जिल्हा स्तरावर 3-4 सदस्यांची समिती, विभागीय स्तरावर 3 सदस्यांची समिती आणि शक्ती केंद्रांवर सदस्यत्व सहयोगी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.