अटल सेतूवरून ५० लाख वाहनांचा प्रवास

वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर

    27-Aug-2024
Total Views |

atal setu


मुंबई,दि.२७ :  
अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू नागरिकांच्या सेवेत दाखल होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अटल सेतूच्या लोकार्पणाने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवा आयाम जोडला गेला आहे. तर या सेतूचा वापर सर्व प्रकारच्या वाहनांकडून केला जातो. १३ जानेवारी २०२४ ते २५ ऑगस्ट २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत या सेतूवरून ५०,०४, ३५० वाहनांनी प्रवास केला असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूचे लोकार्पण करण्यात आले आणि १३ जानेवारी रोजी हा सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल, पुणे व नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळात किमान अर्ध्या तासाची बचत होत आहे. बेस्ट, एनएमएमटी बसेस, तसेच एमएसआरटीसीच्या शिवनेरी बस, तसेच इतर खासगी व व्यावसायिक वाहने अटल सेतूचा नियमित वापर करतात. हा सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई, पनवेल, आणि पुणे या शहरांशी अधिक वेगाने जोडतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो आणि वाहतुकीची सुसूत्रता वाढते.


वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर

दरम्यान, वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम सुमारे ७५% पूर्ण झाले असून, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर वरळी सी-फेसवरून अटल सेतूवर ५ ते १० मिनिटांत पोहोचता येईल. शिवाय, चिरले इंटरचेंजपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यान उन्नत मार्गाचे कामही हाती घेण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर, दक्षिण मुंबई आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरे ते नवी मुंबई, पनवेल, पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अधिक गतिमान होईल.


एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले,"अटल सेतूच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना जलदगतीने आणि सुरक्षितपणे प्रवास करता येत आहे. हा प्रकल्प भविष्यातील अनेक उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तंत्रज्ञान, नियोजन आणि प्रबळ इच्छाशक्ती एकत्र आल्याने व्यापक सामाजिक बदल कशा प्रकारे घडून येऊ शकतो, याचे अटल सेतू हे एक उत्तम उदाहरण आहे."

विमानतळांमधील कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल

अटल सेतूच्या उद्घाटनामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या विमानतळांदरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. हा सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामधील प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षणीय कमी होणार आहे. या नव्या सेतूमुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी आता पूर्वीपेक्षा कमी वेळ लागणार आहे. अटल सेतूचा वापर केल्याने मुंबईच्या दोन्ही विमानतळांमधील वाहतूक सुलभ होईल आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. यामुळे विमानतळांमधील कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल. याचा फायदा केवळ व्यावसायिक प्रवाशांना नव्हे, तर सर्वसामान्य प्रवाशांनाही होईल.

अटल सेतूवर वाहनांची संख्या

कार ४७,४०,६७७

एलसीव्ही / मिनी बस ५०,०२०

बस / २ एक्सल ट्रक ५९,७९९

मल्टी-एक्सल वाहन (3 AXLE) ७३,०७४

मल्टी-एक्सल वाहन (4-6AXLE) ८०,२७७

ओव्हरसाइज्ड ५०३
----------------
एकूण ५०,०४ ३५०