मुंबई : दादरमधील प्रसिद्ध आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘आयडियल दहीहंडी’ मध्ये यावर्षी ‘महिला सुरक्षा आणि सन्मानाचा’ पुरस्कार करण्यात आला. श्री. साईदत्त मित्र मंडळ, बाबू शेठ पवार आणि आयडियल बूक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने पर्यावरण पुरकतेचा विचार करून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ हा या वर्षी ‘आयडियल दहीहंडी’ चा खास विषय होता. या दहीहंडी उत्सवात मालाड पूर्व येथील शिवसागर गोविंदा पथकाने महिला अत्याचाराविरोधातील आणि शिवकाळातील अनेक देखावे सादर केले. दिव्यांग आणि अंध बंधु-भगिणींनी लावलेले थर या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण होते. ही दहीहंडी पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी जमली होती. आयडियल दहीहंडी उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून मिस्टर एशिया रोहन कदम, मिस्टर इंडिया सुहास खामकर आणि अनेक मराठी मालिकांमधील कलाकार उपस्थित होते. गाणी आणि पर्यावरण पूरक सण कसे साजरे करावे यावर आधारित पथनाट्याचे सादरीकरणही या दहीहंडी उत्सवामध्ये झाले. ‘महिलांची दहीहंडी’ हे ‘आयडियल दहीहंडीचे’ दरवर्षी प्रमुख आकर्षण असते. या वर्षी ही हंडी फोडण्याचा मान ‘जॉली गोविंदा पथकाने’ पटकावला.