मुंबई : या घटनेबद्दल सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो. पण आम्ही पुन्हा महाराजांचा पुतळा उभा करू आणि आपला अभिमान, स्वाभिमान आणि हिंदुत्व टिकवू, असे वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. सोमवारी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यावर आता शेलारांनी प्रतिक्रिया दिली. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले की, "जी घटना घडली ती दुर्दैवी, वेदनाजनक, क्लेशदायक आणि दुःखदायक आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो आहे. आमच्या राजाचा अपमान कुणीही सहन करु शकत नाही. यामागे कोण आहे, काय कारण आहे, हे हळूहळू पुढे येईल. पण या घटनेबद्दल सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो. पण आम्ही पुन्हा महाराजांचा पुतळा उभा करू आणि आपला अभिमान, स्वाभिमान आणि हिंदुत्व टिकवू," असे आश्वासन त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, "आपल्या खेळांना, धार्मिक सणांना बंदी घालण्याची भूमिका जेव्हा न्यायालयीन लढाईत झाली तेव्हा भाजप सोडून सगळे पक्ष पाठ फिरवून होते हे विसरता येणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्रजींच्या ठाम भूमिकेमुळे न्यायालयीन लढाईत आम्हाला आणि आमच्या गोविंदांना यश मिळालं. हिंदू, हिंदुत्व, महाराष्ट्र, मराठी आणि आमचा सण, जो जो टिकवेल त्याच्या मागे आम्ही उभे राहू," असेही ते म्हणाले.